पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे वाढल्याचं दिसून येत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून होणारे खून, हत्या, मारामारी, कोयत्याने वार करण्याच्या घटना, त्याचबरोबर कोयता हातात घेऊन तोडफोड करण्याच्या दहशत माजवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली, त्यानंतर दोन दिवसात खूनाच्या घटना देखील समोर आल्या आहेत, अशातच पुण्यातील एकंदरित परिस्थितीवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाष्य केलं आहे. दररोजच्या बातम्या बघून सुसंस्कृत पुण्याची देशभरात बदनामी होत असल्याचे जगजाहीर आहे, असं म्हणत त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


काय म्हणालेत अनिल देशमुख?


अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी याबाबतची पोस्ट आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये देशमुखांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी या परिस्थितीवर लक्ष्य द्यावं असं आवाहन देखील केलं आहे. "शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या आहेत. यातून पुणे शहराची ओळख क्राइम कॅपिटल अशी होत चालली आहे. खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ या दररोजच्या बातम्या बघून सुसंस्कृत पुण्याची देशभरात बदनामी होत असल्याचे जगजाहीर आहे. शहरात टोळी युद्धाचा देखील भडका उडालाय, कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर भयभीत आहेत. निष्क्रिय गृहमंत्र्यांनी या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि कठोर पावले उचलावीत", असंही देशमुखांनी (Anil Deshmukh) म्हटलं आहे. 






पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या


रविवारी सायंकाळी पुण्यातील नाना पेठे येथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्याचबरोबर कोयत्याने वार करण्यात आला. जवळपास 12-13 जणांची वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केल्याचं सीसीटिव्हीच्या माध्यमातून समोर आलं आहे. सदर प्रकरणी पुणे पोलिसांनी अनेकांना ताबयात घेतलं आहे. या घटनेनंतर आंदोकर यांच्या बहीण, मेहुणा, भाचा यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शी ही हत्या कौटुंबिक   वादातून केल्याचं समोर आलं मात्र, आता या घटनेबाबत अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. 


क्षुल्लक कारणास्तव खून


हडपसर परिसरात हॉटस्पॉट न दिल्यामुळं कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  टोळक्याने गृहकर्ज मिळवून देण्याची एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीचा कोयत्याने डोक्यात सपासप वार करून निर्घृण ण खून केला. मोबाईलचे हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा हत्या (Pune Crime News) करण्यात आल्याचं समोर आलं आहे.


वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय 47, रा. उत्कर्षनगर सोसायटी, सासवड रोड, हडपसर) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मयूर भोसले (वय २०, रा. वेताळबाबा वसाहत) याला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्यासह आणखी तीन अल्पवयीन आरोंपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वासुदेव कुलकर्णी यांचा भाऊ विनायक कुलकर्णी (वय 51) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (ता.1) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास उत्कर्षनगर सोसायटीच्या समोरील फुटपाथवर सासवड रोड येथे घडली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या आणि विनयभंगांच्या घटना


पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या, शाळकरी मुलींच्या विनयभंगाच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलींना रिक्षावाले, स्कून व्हॅन चालक, शिक्षक यांच्याकडून विनयभंगाची, अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे, यावरतीही अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे.