Bhandara News : वाळू घाट चालवतांना कोतवालापासून ते जिल्हाधिकारी, महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलीस शिपाई ते पोलीस अधिक्षक, गृहमंत्री व मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणे-घेणे करण्यात येतं. त्यामुळं कुणीचं आमचा बालबांका करु शकत नाही, असा तोरा अधिकाऱ्यांच्या चेले चपाट्यांचा असल्याचा घणाघाती आरोप सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांनी लावला आहे. 


जिल्ह्याला बिहार बनवायचं नसेल तर... 


भंडारा (Bhandara News) जिल्ह्याला बिहार बनवायचं नसेल तर भंडाऱ्यात सुरू असलेली अवैध वाळू उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. या संदर्भात आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore)  यांनी मोहाडीचे तहसीलदार यांना केलेल्या पत्रातून ही मागणी केली आहे. या लेटर बॉम्बमध्ये मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत पैसा पोहोचत असल्याचा उल्लेख असल्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हे पत्र विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हाती लागलं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पत्र थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाचून दाखवलंय. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांनी वाळू वाहतुकीची पोलखोल केल्यानं विरोधकांना ते आता आयतं कोलीत सापडलं आहे.


राजू कारेमोरे यांच्या पत्रात याचा आहे उल्लेख


मोहाडी तालुक्यातील बेटाळा, निलज, कान्हळगाव, मुंढरी, मोहगाव देवी, पांजरा, रोहा या वाळू घाटावर रेती डेपो आहेत, तर काही घाटावर डेपो नाहीत. ज्या ठेकेदारांनी सदर डेपो किंवा घाट घेतलेले आहेत, ते फक्त नाममात्र आहेत. सदर संपूर्ण घाट व डेपो वैध पध्दतीनं किंवा नियमानुसार नं चालवता अवैध पध्दतीनं व नियम धाब्यावर बसवून चालवत आहेत. खनीज अधिकारी, कर्मचारी, आपण व आपले चेले-चपाटे चालवित आहेत. त्यामुळं शासनाची व जणप्रतिनीधींची जनतेमध्ये खुप बदनामी होत आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेवून मोठ्या प्रमाणात हे काळे काम चालत आहेत. त्यामुळे विधान सभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे. रेती, मॅगनीज गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत.


जर तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्र किंवा संपूर्ण भंडारा जिल्ह्याला बिहार बनवायचं नसेल तर वरील गैरप्रकार त्वरीत थांबवावे, भविष्यात एखादीं अप्रिय घटना घडली तर तहसीलदार सर्वस्वी जबाबदारी राहील, अशी धमकीवजा मागणी या पत्रातून आमदार कारेमोरे यांनी केली आहे.


हे ही वाचा