Uddhav Thackeray : तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचे बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या. मुंबईतील शिवसेना मेळाव्यात स्वबळाचे संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. त्यामध्ये ते बोलत होते. 


पक्ष वाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करुन त्यांना अधिकार देणे गरजेचं आहे. मुंबईतून राज्यभरात जाणाऱ्या संपर्कप्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप कमी करून स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करणं गरजेचं असल्याचे मत अनेक नेत्यांनी या बैठकीत बोलून दाखवले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने तयारीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमाीवरउद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांनी आज सर्वांना मार्गदर्शन केलं, तसेच पुढील रणनितीबाबत काही सूचना देखील केल्या आहेत.


25 जानेवारीला रात्री आठ वाजता भारत माता संविधान पूजन केलं जाणार : राऊत


26 जानेवारी च्या पूर्वसंध्येला 25 जानेवारीला रात्री आठ वाजता भारत माता संविधान पूजन केलं जाईल आणि मिरवणूक काढली जाणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. तालुकास्तरावर जिल्हास्तरावर मिरवणूक आणि पूजन केले जाईल असेही ते म्हणाले. उद्या शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे रात्री आठ वाजता  संविधान आणि भारत माता पूजन  करणार आहेत. संविधान भारत माता धोक्यात आहे. आपण त्याचे रक्षण करत आहोत आणि त्यामुळे संविधान आणि भारत मातेचे पूजन हे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केला जाईल असे राऊत म्हणाले. आज आढावा आणि संघटनात्मक बैठक होती असे राऊत म्हणाले. 


शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता?


शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. ज्या भाजपचे सरकार राज्यात आहे त्या भाजपने त्यांच्या मित्राला धक्का देऊन स्वबळाची तयारी केली होती. थोडे आमदार कमी पडले नाहीतर मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते असे जाधव म्हणाले. पण शिवसेना वाढली पाहिजे असे शिवसैनिकांना वाटत आहे असेही भास्कर जाधव म्हणाले. बाळसाहेब ठाकरे यांनी अनेक संकटे उधळून लावली. संकटाना नेस्तनाबूत करून शिवसेना उभी केल्याचे भास्कर जाधव म्हणाले. आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवली असे विरोधकांना वाटत असेल पण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्यांचे विचार सर्व शिवसैनिकांच्या नसांत भिनवूया असे भास्कर जाधव म्हणाले.