मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात सुरु असलेली अंतर्गत धुसफुस आता शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. नव्या सरकारमधील मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) नेमण्याच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेनेचे मंत्री (Shivsena Ministers) प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी नेमण्याच्या ऑर्डर रखडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भातील फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात (CMO Office) पडून आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांना स्वीय सहाय्यक आणि ओएसडी यांच्याशिवाय कारभाराचा गाडा रेटावा लागत आहे. त्यामुळे या मंत्र्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा मागे लागूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री कार्यालयावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.


राज्य मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आल्यानंतर भाजपने स्वीय सहाय्यक आणि ओएसडींच्या नेमणुकीसाठी नवी पद्धत वापरायचे ठरवले होते. त्यानुसार आता प्रत्येक मंत्र्याकडे नेमण्यात येणाऱ्या पीए आणि ओएसडीची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. या परीक्षेतून तावून सुखाखून बाहेर पडल्यानंतरच संबंधित पीए आणि ओएसडींची नेमणूक केली जाणार आहे. या चाळणीमुळे अद्याप शिंदे गटाच्या मंत्र्यांना पीए आणि ओएसडी मिळू शकलेले नाहीत. यामध्ये संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. 


उदय सामंतांची नाराजी


उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत नाराजी पत्रात व्यक्त केली आहे.


धोरणात्मक निर्णय, महत्त्वाचे कामकाजाबाबत आणि  कामकाजाविषयी सचिव उद्योग तसेच मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी यांनी नियमित ब्रिफिंग करावी. याची दक्षता घ्यावी असा सज्जड दमचं पत्रातून अधिकाऱ्यांनी भरला आहे.अधिकारी परस्पर कारभार करतात, मंत्र्यानाही विश्वासात घेत नसल्याची खंत सामंतांनी पत्रातून बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


प्रत्येक मंत्र्याकडे समन्वयक नेमणार


महायुती सरकारमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याकरिता पक्षाकडून प्रत्येक मंत्री महोदयांकडे एक स्वीय सहाय्यक हा पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक' म्हणून नियुक्त केला जाणार आहे. जिल्ह्यातील विकासकामे आणि कार्यकर्त्यांची कामे सुलभ पद्धतीने व्हावीत यासाठी भाजपने समन्वयक पदाच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश काढले होते. तसेच महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रही त्यांनी प्रसिद्ध केले होते. 



आणखी वाचा


मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


एकनाथ शिंदेंच्या 3 लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ब्रेक? 'आनंदाचा शिधा', 'शिवभोजन थाळी' बंद होणार