Uddhav Thackeray: मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासमोर बसलो असताना एकनाथ शिंदे यांचा फोन आला. हे कळताच उद्धव ठाकरे दुसऱ्या खोलीत निघून गेले. परत येऊन त्यांनी हे विचारले नाही की, एकनाथ शिंदे काय बोलत होते. म्हणजे आमचे उद्धव ठाकरे किती सोज्वळ आहे, असे कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी कल्याणमध्ये आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांना सांगितले आहे. या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याची सर्व शिवसैनिकांनी शपथ घेतली.


कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडल्याचं दिसून येत आहे. शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण आहे. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ ठाण्यातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहे. शिवसेनेला उभारी देण्यासाठी पक्षाने राज्यात विविध कार्यक्रम सुरू केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तर आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. काही ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली निर्धार मेळावे सुरू आहे. 


मेळाव्या दरम्यान भाषण करताना विजय साळवी यांनी एक किस्सा सांगितला. तो किस्सा ऐकून सर्व शिवसैनिक भावूक झाले. ज्या रात्री शिंदे यांनी सुरत गाठली. त्याच रात्री अडीच वाजता उद्धव ठाकरे यांचा विजय साळवी यांना फोन आला. त्यांनी त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतले. मातोश्रीवर बोलवून घेतले असता त्याचवेळी शिंदे यांचा फोन आला. हे कळताच उद्धव साहेब दुसऱ्या खोलीत निघून गेले. परत येऊन हे पण विचारले नाही एकनाथ शिंदे काय बोलत होते. म्हणजे उद्धव ठाकरे किती सोज्वळ आहे. इतकेच नाही तर काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो नव्हता. विजय साळवी यांचा फोटो वापरण्यात आला होता. त्यावेळी साळवी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ज्या बॅनवर उद्धव ठाकरेंचा फोटो नसेल त्या बॅनरवर माझा फोटो वापरु नये, असे स्पष्ट केलं होते .नव्या कार्यकारिणी संदर्भात मातोश्रीवर निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी दिली आहे.