अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना उमेदवारी दिलेली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिलीय. वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत भाजप नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी भेटीत काय घडलं यासंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, असं स्नेहलता कोल्हे म्हणाल्या. त्यामुळं जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होईल त्यानंतर स्नेहलता कोल्हेंचे समर्थक सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात सक्रीय होतात का हे पाहावं लागेल.

  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची शिर्डीत बैठक झाली. मागील अनेक दिवसांपासून स्नेहलता कोल्हे या पालकमंत्री राधाकृष्ण विखेंवर नाराज असल्याचे पाहायला मिळायला मिळाले होते. त्यामुळे कोल्हे या शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात दिसल्या नाहीत.  मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक झाल्यानंतर आपली नाराजी दूर झाली का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नाराजी अशी नाही,मतदारसंघातील काही विषय होते त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, असं स्नेहलता कोल्हे म्हणाल्या. 


आमची नाराजी राधाकृष्ण विखेंवर नाही तर पालकमंत्री म्हणून काही गोष्टी होत्या, ज्यात विकास निधी, रस्त्याची कामं असे काही मुद्दे होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील आमचे कार्यकर्ते चर्चा करतील तसेच पक्षांतर्गत आमच्यावर जो काही अन्याय झाला याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील चर्चा केली जाईल असं स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे. एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांनी स्नेहलता कोल्हे यांच्याशी बैठक करून त्यांची विखेंवरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय कार्यकर्ते घेतील, असं कोल्हे यांनी म्हटल्याने त्यांची नाराजी दूर झाली का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 


प्रचारात सक्रीय होणार का यासंदर्भात विचारलं असता स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर निर्णय होईल असं म्हटलं आहे. 


संबंधित बातम्या :



 Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार, म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...