Eknath Shinde on Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुंबईतील खारमधील शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं गायलं. कुणालनं गायलेल्या गद्दार नजर वो आए... या गाण्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली. या प्रकरणावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आरोपांवर प्रतिक्रिया देतच नाही. तीन वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोकं झाडत होते. मी नेहमी सांगायचो की, आरोपांना मी कामाने उत्तर देणार आहे. आरोपांना आरोपाने उत्तर द्यायला लागलो, तर आपला फोकस बदलतो. आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिले. त्यामुळे जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. 80 पैकी 60 जागा आम्हाला मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 20 जागा निवडून आणता आल्या.  

सुपारी घेऊन बोलण्याचे काम 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु, तुम्ही गैरफायदा घेऊन विडंबन करू शकता. मात्र, हा एक प्रकारचा व्यभिचार, स्वयराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचे काम या माणसाने केले. मी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. याच माणसाने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, अर्णब गोस्वामी, उद्योगपतींबद्दल काय विधाने केली आहेत? ते पाहा. हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मी बोलणार सुद्धा नाही. मी काम करणारा माणूस आहे.

अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन असते

तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड योग्य आहे का? याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, मी तोडफोडीचे समर्थन करत नाही. समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या स्तराला जातो, हो पाहिले पाहिजे. अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते. मी संवेदनशील आहे. मला सहन करण्याची खूप ताकद आहे. मी कुणालाही बोलत नाही. शांत राहणे, काम करणे, कामावर फोकस केंद्रीत करणे आणि लोकांना न्याय देण्याचे काम मी करतो. त्यामुळेच देदिप्यमान असं यश आम्हाला मिळालं आहे, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

चोरी करणारे गद्दारच, कुणाल कामराने सत्यात्मक गाणं केलं, त्या जनभावना आहेत, उद्धव ठाकरेंनी केलं समर्थन