Uday Samant Rajan Salvi: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी गुरुवारी (13 फेब्रुवारी) ठाण्यातील कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कोकणातला हा ढाण्या वाघ पुन्हा खऱ्या सेनेच्या गुहेमध्ये दाखल झाल्याचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. राजन साळवींचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात होता. सर्व चर्चाही झाली होती. मात्र राजन साळवींनी भाजपऐवजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. याची परिणती राजन साळवी यांनी पक्ष सोडण्यात झाली आहे.
रत्नागिरीत सामंत बंधूंच्या वर्चस्वाला शह?
दैनिक लोकसत्ता वृत्तापत्राच्या वृत्तानूसार, महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता. त्यामुळे राजन साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध होता. तसेच शनिवारी उदय सामंत यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंची सभाही होती. या सभेत राजन साळवींचा पक्षप्रवेश करता आला असता. मात्र तसे न करता एकनाथ शिंदेंनी राजन साळवींना ठाण्यात बोलावून राजन साळवींचा पक्षप्रवेश करुन घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना पक्षात घेऊन सामंतांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सामंत बंधूंची जमेची बाजू-
1 ) रत्नागिरी - संगमेश्वर आणि लांजा - राजापूर - साखरपा या लगतच्या मतदारसंघात अनुक्रमे उदय आणि किरण सामंत लोकप्रतिनिधी.
2 ) आर्थिक दृष्ट्या सक्षम
3 ) किरण सामंत यांच्या कामांच्या धडाक्यामुळे मोठ्या प्रमाणात लांजा, राजापूर, साखरपा या ठिकाणची सर्वसामान्य माणसं देखील किरण सामंत यांच्याकडे आकृष्ट
4 ) प्रशासनावर उत्तम पकड आणि काम करून घेण्याची लकब.
5 ) उदय सामंत मंत्री आणि पालकमंत्री असल्यानं जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या हातात
राजन साळवी यांची जमेची बाजू-
1 ) शिवसेना फुटीनंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील राजन साळवींसाठी खुद्द एकनाथ शिंदेंचा पुढाकार
2 ) एकसंध शिवसेनेत काम केल्यामुळे जुन्या - जाणत्या सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्यासोबत जवळचे संबंध
3 ) सहजपणे लोकांमध्ये मिसळणे, साधेपणा, मृदुभाषी आणि हाडाचा कार्यकर्ता म्हणून ओळख
4 ) थेट एकनाथ शिंदे यांनी प्रवेशासाठी पुढाकार घेतल्यानं साळवी आणि शिंदे यांचे संबंध अधोरेखित. शिंदेंच्या जवळचा आणि विश्वासातील व्यक्ती म्हणून पुन्हा शिक्कामोर्तब
5 ) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, साखरपा या भागात अगदी घराघरात पोहोचलेला आणि ओळख असलेला लोकप्रतिनिधी. रत्नागिरी जिल्ह्यात देखील दांडगा जनसंपर्क