Satara crime news: सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. प्रकाश शिंदे (Prakash Shinde) हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी 2017 साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांनी ही माहिती लपवून ठेवली. पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली पण ड्रग्जशी संबंधित ज्या तीन लोकांची नावं एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत, असा दावा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. एखाद्या प्रकरणात पोराचं नाव आलं तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. यानंतर मला काहीही झालं तर आज ज्यांची ज्यांची नाव मी घेतली ते लोक जबाबदार असतील, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण उघडकीला आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर सक्तीचं राजकारण बाजूला ठेवून ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी आशा मला आहे. ऍड उके नावाच्या व्यक्तीने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, नवाब मलिक यांनी देखील काही मुद्दे समोर आणले होते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं होते हे सर्वांनी पाहिले.
Sushma Andhare: सुषमा अंधारे यांनी नेमके काय आरोप केले?
13 डिसेंबर रोजी सावरी गावात कारवाई झाली. सुरवातीला मुकंद गावात कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे पुण्यात आले. यात विशाल मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाली. या गावात पोलिसांचे पथक पोहोचले. मी स्वतः सावरी गावात जाऊन आले आणि मला काही धक्कादायक माहिती मिळाली. याठिकाणी कोयनेचे बॅकवॉटर आहे. इथे स्विमिंग टँक तयार होत आहेत. रिसॉर्ट होत आहे.. इथून जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला आहे. इथे गाव नाही, माणूस नाही तरी येथे शेडला जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला? येथील रिसॉर्टमध्ये सात ते आठ रूम बांधून तयार आहेत. या रिसॉर्टमध्ये अनेक सुविधा आहेत. याठिकाणी एक डस्टर गाडी आहे. पोलिसांनी या रिसॉर्टमध्ये केलेल्या कारवाईत 45 किलो ड्रग्स सापडले. याची किंमत 145 कोटी आहे. ही बातमी फार चर्चेत आले नाही. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. या शेडचा मालक गोविंद सिंदकर.आहे. याच्या शेडची चावी ओंकार दिघे याने घेतली अशी माहिती गोविंद याने दिली. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडले. पोलिसांनी त्याला का सोडलं हे अजून माहीत नाही. मुंबई पोलिस त्याठिकाणी का गेले?, असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.
रणजीत शिंदे हा एकनाथ शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे. एकनाथ शिंदे ज्या गावाचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी समोर आल्या. रणजीत शिंदे कुठे आहे? त्याचं नेमकं काय झालं? रणजीत शिंदे याने हे हॉटेल का चालवावे,त्याचा काय संबंध? प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. ठाण्यातून 2017 आली त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी की, याठिकाणी तीन जण राहत होते. आसाम राज्यातून त्यांना याठिकाणी कुणी आणले असेल? यातले काही बांगलादेशी आहेत असही म्हटलं जातं? हे तीन रिसॉर्टमध्ये कसले काम करत होते? SP तुषार दोशी यांनी माहिती लपवली.
स्थानिक लोकांनी सांगितलं की, ही लोकं भारतीय नसावीत. त्यांच्या चेहऱ्याची ठेवणं वेगळी दिसत होती. या तीन लोकांना जेवण प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून जात होते. या तीन कामगारांना या पंचतारांकित हॉटेलमधील जेवण कसे परवडत होते? अर्थात ही माहिती पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. या तीन जणांची नावं पोलिसांच्या एफआयआरमध्ये का नाहीत? FIR ऑनलाइन का दिसत नाही, FIR अशी लपवता येत नाही. सरकारशी संबंधित जेव्हा FIR असतात तेव्हा त्या लपवल्या जातात. जे हॉटेल आहे की रिसॉर्ट? याचे नाव हॉटेल तेजयश आहे. हेतेज आणि यश प्रकाश शिंदे यांची मुले आहेत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.