मुंबई : नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीत काहीसा तणाव पाहायला मिळत आहे. महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे, मात्र पुण्यासंदर्भात आम्ही अजित पवारांच्या पक्षाविरुद्ध लढू, अशी थेट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामुळे, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी नेमकं काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, मुंबईतील (Mumbai) निवडणुकीत नवाब मलिक हे भाजपसोबत नको अशी भूमिका मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीनेही मुंबईत स्वबळाची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी यासंदर्भात माहिती देताना आजच निर्णय होईल, असे सांगितले.
मुंबईत मनपा निवडणुकीत महायुतीसोबत जायचे की नाही याचा निर्णय आज घेतला जाईल, असे म्हणत अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील पदाधिकारी आणि नेत्यांसोबत आज चर्चा करण्यात येईल, त्यानंतर राष्ट्रवादीचा महापालिका निवडणुका लढवण्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल, अशी भूमिका, अजित पवार यांनी व्यक्त केली. तर, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्रपणे लढण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे, अजित पवारांची राष्ट्रावादी मुंबई आणि पुण्यात महापालिका निवडणुकांसाठी महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे.
तेव्हा कोकाटेंबाबत निर्णय घेऊ - अजित पवार
दरम्यान, आमचा माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधायला सुरू आहे. याप्रकरणी, कोर्टात पुढे काय होते हे पाहू, त्यानंतर कोकाटेंबाबत काय निर्णय घ्यायचा ते ठरवू, अशी भूमिका अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली.
नवाब मलिक आमचे ज्येष्ठ नेते - पटेल
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची मुलगी एनसीपीची आमदार आहे. एनसीपीकडून कोणाशी काय चर्चा करायची ते आम्ही ठरवू, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका मांडली. तर, महायुतीत काही चांगली लोकं येत असतील तर स्वागत करू, असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.
हेही वाचा