नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  अजित पवार गटाच्या  संपर्कात असल्याचा  दावा  राज्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी केला आहे.  लवकरच अजित पवार गटातील आमदारांचा आकडा 53 वर पोहचणार असंही ते म्हणाले आहेत. आत्राम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.


धर्मरावबाबा आत्राम  म्हणाले, शरद पवार गटाचे जे नेते दावा करत फिरत आहे की आमच्या संपर्कात अजित पवार गटाचे 15 आमदार आहे. मात्र दावा करणारेच जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात  आहे. आमच्या गटाच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. दर मंगळवारी अजित पवार हे आमदाराची बैठक घेतात. त्याच्या समस्या , मतदार संघातले ऐकून घेतात. हे आधी होत नव्हतं म्हणून सर्व आमदारांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व आमदार अजित पवार गटात येऊन खूश आहेत.


आमदारांचा आकडा 53 वर जाणार 


शरद पवार गटाचे उरलेले आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच आमच्या आमदारांचा आकडा हा 53 वर पोहचणार  आहे. आमची लोकसभेची मिशन 45 ची तयारी सुरु झाली असून मी गडचिरोली लोकसभा मतदार संघात लढायला इच्छुक असून त्या तयारीच्या कामाला देखील लागल्याचे आत्राम यांनी सांगितले.


काय म्हणााले होते जयंत पाटील?


अजित पवार गटातील 15 आमदार आमच्या संपर्कात असून अनेक जणांना परत पक्षात यायचे आहे. याबाबत विचारही सुरु आहे. मात्र, अंतिम निर्णय शरद पवारच घेतील,  असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल होता. अजित पवारांनी जुलैमध्ये बंड करत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांनाच आव्हान दिलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले, यानंतर दोन गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला. असे असतानाच आता जयंत पाटील यांनी केलेला दावा अजित पवार गटाकडून फेटाळण्यात आला आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्यानंतर शरद पवार गट आणि जयंत पाटलांकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 



हे ही वाचा :


पाच राज्यांच्या निवडणुका राष्ट्रवादीचे दोन्ही गट लढवणार नाहीत, चिन्हाचा वाद होऊन ते गोठू नये यासाठी निर्णय