रायगड/ रत्नागिरी :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024)  भाजपकडून (BJP) सध्या जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक प्रचाराआधी सामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध मोहिमा भाजपने सुरू केल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे  भाजपच्या 'घर चलो अभियाना'त सहभागी झाले आहेत. या दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्थानिकांना पुढील पंतप्रधान कोण हवंय असा प्रश्न केला. त्यावेळी स्थानिकांनी बावनकुळे यांना राहुल गांधी (Rahul Gandhi) असे उत्तर दिले. स्थानिकांनी दिलेल्या या अनपेक्षित उत्तरानंतर बावनकुळे यांना वेळ मारत नेण्याशिवाय पर्याय नव्हता. 


रायगड लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौरा केला. भाजपच्या घर चलो मोहिमेतंर्गत बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यासह  रत्नागिरीतील गुहागरमधील शृंगारतळी बाजारपेठेत त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही ठिकाणच्या चौक सभांना संबोधित केले. त्याशिवाय, दुकानदार, सामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. 


बावनकुळे यांची पंचाईत...


या दरम्यान संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दुकानदारांना पुढील पंतप्रधान कोण हवेत असा प्रश्न केला. त्यावेळी रायगडमधील एका दुकानदाराने राहुल गांधी असे उत्तर दिले. दुकानदाराच्या या अनपेक्षित उत्तरामुळे बावनकुळे यांनी वेळ मारून नेण्यासाठी 450 लोकानंतर एकाने राहुल गांधी असे उत्तर दिले असल्याचे म्हटले. त्यानंतर रत्नागिरीतील रत्नागिरीतील गुहागरमधील शृंगारतळी बाजारपेठेतही बावनकुळे यांनी  एका दुकानदाराला असाच प्रश्न केला. त्यावेळी त्याने बावनकुळे यांना राहुल गांधी असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तरानंतर बावनकुळे यांनी भाजपचे उपरणे परिधान केलेल्या कार्यकर्त्याला प्रश्न केला. त्याने नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. त्यानंतर त्या कार्यकर्त्याच्या मागे असलेल्या एकाला प्रश्न केला, त्यानेही मोदी असे उत्तर दिले. 







कल्याण लोकसभेची जागा कोण लढवणार? 


ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केली नाही, या दोन्ही जागा कुणाकडे जाणार हे अद्याप ठरलं नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. या जागा कुणाकडे जातील हे केंद्रीय समिती ठरवेल असंही ते म्हणाले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे. कारण ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे तर कल्याणमधून त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी भाजपची ही रणनीती आहे का याची चर्चाही सुरू आहे.