ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या लोकसभा जागावाटपाच्या निमित्ताने बरीच दमछाक होताना दिसत आहे. यवतमाळ-वाशिम, हिंगोली आणि रामटेकमध्ये शिंदे गटाला भाजपच्या दबावामुळे आपल्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देता आलेली नाही. याशिवाय, नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राखण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना संघर्ष करावा लागत आहे. अशातच सोमवारी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी नाराज शिवसैनिकांचा जमाव येऊन धडकला. 


हे सर्वजण धाराशिव लोकसभा (Dharashiv Loksabha) मतदारसंघातून आले आहेत. धाराशिवमध्ये अजितदादा गटाने राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. या नाराज कार्यकर्त्यांनी सोमवारी थेट एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थान गाठले. 


2000 फोर व्हीलर, शेकडो कार्यकर्त्यांचा जत्था नंदनवन बंगल्यावर


धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतून उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन केले. तानाजी सावंत समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले होते.


धाराशिव लोकसभेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने तानाजी सावंत आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाल्याच्या चर्चा सुरु आहे. धाराशिवची जागा शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने ती शिवसेनेला मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. 


धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे स्थानिक शिवसैनिक नाराज झाले आहेत. धाराशिव लोकसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी यासाठी दोन हजाराहून अधिक चारचाकी वाहनातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली नाही तर आम्ही राष्ट्रवादीचे काम करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. 


धाराशिव  लोकसभेची जागा शिवसेनेला देण्याची मागणी करत शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री न्याय देतील असा विश्वास धनंजय सावंत यांनी व्यक्त केला आहे. यावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. 


आणखी वाचा


ओमराजे निंबाळकर 100 बापाचा, त्याच्या तिकीटासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटी दिले, निवडून आणलं; शिंदेंचे मंत्री तानाजी सावंत यांनी टीकेची पातळी सोडली