Mumbai: काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री असताना त्यांना सातपुडा बंगला दिला गेला होता. पण मंत्रीपद गेल्यानंतरही त्यांना हा बंगला सोडवत नसल्याची टीका होत होती. दरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत माजी मंत्री धनंजय मुंडे सातपुडा हा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सातपुड्यावर राहायला जाण्यासाठी वेटिंगवर आहेत.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर साधारण 15 दिवसात मंत्र्यांना बंगला रिकामा करावा लागतो. त्यानंतरही बंगला रिकामा केला नाही तर मंत्र्यांकडून दंड आकारला जातो. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंगला सोडला नसल्याने आतापर्यंत त्यांना 42 लाखांचा दंड झालाय. हा दंड वसूल करायचा की माफ करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो.
धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता
30 सप्टेंबर पर्यंत माजी मंत्री धनंजय मुंडे सातपुडा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता आहे. मुंडे यांनी 30 सप्टेंबर पर्यंत बंगला रिकामा करण्याचा आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मार्च महिन्यात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु अद्याप त्यांनी सरकारी बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ यांना सरकारी निवासस्थानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. धनंजय मुंडे यांनी बंगला सोडल्यानंतर तो मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावरून महिनाभरापूर्वी धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती.
धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया...
"मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्या योग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारासाठी मुंबईत राहणे गरजेचे आहे. या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे. माझा शोधही सुरू आहे. माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंती केली आहे." अशी प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती.