बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वीपासून बीड (Beed) जिल्ह्यातील जातीय सलोखा व सामाजिक स्वास्थ बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, गेल्या महिनाभरापासून बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळेही बीड जिल्हा चर्चेत असून जिल्ह्यातील दहशत व गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बीडमधील वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जात असून खंडणी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, मोक्काअंतर्गतही कारवाई सुरू आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनजंय मुंडे हे गुंडांना सांभाळत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापुजेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे प्रतिवर्षीप्रमाणे उपस्थित राहिले. यावेळी आपल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा अशी प्रार्थना धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी श्री गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ यांच्या चरणी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे आज संत वामन भाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे. मागील साधारण 20 ते 25 वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडे हे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्रीच गहिनीनाथ गड येथे दाखल झाले. पहाटेच्या विशेष महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचे बळ देते, असेही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान, येथील दर्शनानंतर धनंजय मुंडेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे मुंडेंनी म्हटले. मात्र, याप्रकरणी जास्त बोलण्याचं त्यांनी टाळलंय
अन् दोघांनीही एकमेकांना बांधला फेटा
दरम्यान संत वामन भाऊ यांच्या समाधीची महापूजा संपन्न झाल्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची ओळख असलेला मानाचा फेटा धनंजय मुंडे यांना बांधला. तर गडाचे महंत म्हणून धनंजय मुंडे यांनी विठ्ठल महाराज शास्त्री यांनाही तसाच फेटा स्वतःच्या हाताने बांधला. यावेळी संत वामन भाऊ यांच्या नावाचा जयघोष असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हेही वाचा