मुंबई : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडाची थरारक आणि करुण कहाणी सांगितल्याने सभागृह शांत झालं होतं. सभागृहात भावूक वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या हत्याकांडातील दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मारहाणीच्या घटनेचे फोटो व्हायरल झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे फोटो व्हायरल झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मागणी होत असलेल्या धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, संतोष देशमुख प्रकरणावर या अधिवेशनात मागील दोन आठवड्यात व्यापक चर्चाच झाली नसल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशीच मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) राजीनामा घेण्यात आल्याने या चर्चेवर म्हणावे तेवढी चर्चा अधिवेशनात आणि दोन्ही सभागृहात झाली नाही.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर संतोष देशमुख प्रकरण सभागृहात व्यापक दृष्टिकोनातून चर्चेला आले नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर संतोष देशमुख प्रकरणावर सभागृहात विरोधकही शांत झाल्याचं पाहायला मिळालं. नागपूर हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या संतोष देशमुख प्रकरणात अर्थसंकल्पीय अधिवेशनात शांतता दिसून आली. या घटनेचे दुसरे कारण म्हणजे आता संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे, यापुढे पोलीस कारवाईपेक्षा न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष राहिल. मात्र, अद्यापही संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एक आरोपी संतोष आंधळे हा फरार आहे. पोलिसांकडून संतोष आंधळेचा शोध घेता जात आहे, पण त्याला अटक केल्यानंतर पोलिसांना आणखी माहिती मिळेल, असे दिसून येते.
मुंबईत 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिले तीन दिवस संतोष देशमुख प्रकरण आणि याच प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी सभागृहात आणि सभागृहाबाहेर झाली. 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर सभागृहात संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा उचलला गेला नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याची माहिती सभागृहात न देता ती माहिती सभागृहाबाहेर दिली, त्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. मात्र, त्यानंतर संपूर्ण प्रकरण विरोधकांकडूनही आणि सत्ताधाऱ्यांकडूनही शांत झाल्याचंच पाहायला मिळालं.
नागपूर अधिवेशनात गाजले प्रकरण
नागपूर अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलं होतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार सुरेश धस यांसारख्या नेत्यानी या हत्याकांडाच्या घटनेनं सभागृहात दणाणून सोडलं होतं. मात्र,या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यानंतर एक आरोपी सोडून इतर सर्व आरोपींना अटक झाल्यानंतरही अधिवेशनात यावर सखोल चर्चा झाली नाही. उर्वरित सात दिवसात या प्रकरणावर सखोल चर्चा होण्याची शक्यताही तशी कमीच दिसून येते.