Madha Loksabha : माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. गुढी पाडव्यानंतर मोहिते पाटील तुतारी हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रणजित निंबाळकर यांच्या विरोधात पहिल्या दिवशी पासून मोहिते पाटील यांच्या सुरात सूर मिसळून रामराजे निंबाळकर यांनी विरोध सुरु केला होता. त्यामुळे रणजित निंबाळकर यांना टोकाचा विरोध करणाऱ्या रामराजे निंबाळकरांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात. 


रामराजे मोहिते पाटलांना छुपी मदत करणार?


रामराजे निंबाळकर हे मोहिते पाटीलांना छुपी मदत करणार असल्याच्या चर्चेने महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अजितदादांच्या बारामतीसह इतर जागांवर देखील याचे पडसाद उमटू शकतात. गेल्याकाही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेत माढ्यातून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन सविस्तर चर्चा देखील केली होती. प्रवेश करताना अमावस्येनंतर करावा असा सल्ला निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मोहिते पाटील 9 एप्रिल रोजी तुतारी फुंकणार आहेत. 


धैर्यशील मोहिते पाटलांचे दौरे वाढले 


माढा लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात शरद पवार यांच्याशी सर्व चर्चा झाली असून साधारण 25 किंवा 16 एप्रिल रोजीचा मुहूर्त उमेदवारी दाखल करण्यासाठी काढण्यात आल्याचा सूत्रांची माहिती आहे. या भेटीनंतर पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार दौरे सुरु केले असून आज त्यांनी फलटण , माण , खटाव याभागात महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. उद्या धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळा दौऱ्यावर जाणार असून आता त्यांच्या दौऱ्याचे कार्यक्रम देखील माध्यमांना पोहोचण्यास सुरुवात झाली आहे . त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार असल्याचे निश्चित झाले आहे. 


रामराजे छुपी मदत करणार की, घरवापसी करणार? 


मोहिते पाटील यांच्या मदतीला रामराजे निंबाळकर उतरणार की छुपा तुतारीच्या प्रचार करणार यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे . रामराजे यांचे समर्थक तुतारीचाच प्रचार करणार असल्याचे सांगत असल्याने अजित पवार यांच्या महायुतीतील अडचणी वाढणार आहेत.रामराजे निंबाळकर यांनी काही दिवसापूर्वी फलटण येथे मेळावा घेऊन भाजप उमेदवाराला असणारा विरोध अजित पवार यांच्या समोर मांडला होता . मात्र यानंतर युतीचा धर्म पाळून सर्वांनी काम करावे लागेल अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या होत्या . आता धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार होत असतील तर रामराजे फलटणमध्ये काय करणार हा महत्वाचा प्रश्न असणार आहे. 


काही दिवसापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबातील महत्वाच्या सदस्यांनी रामराजे यांचे बंधू संजीव निंबाळकर आणि इतरांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती . मोहिते पाटील आणि निंबाळकर कुटुंबाचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध असल्याने रामराजे आता काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. शिवाय, मोहिते पाटील यांच्याप्रमाणे घरवापसीचा निर्णय घेणार का? हे येत्या चार दिवसात समोर येणार आहे. 
     
मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश नक्की झाल्यानंतर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले. त्यांनी माळशिरस तालुक्यातील कट्टर मोहिते विरोधक असणाऱ्या 45 प्रतिनिधींसोबत सागर बंगल्यावर सविस्तर चर्चा केली होती . आज दिवसभर भाजप उमेदवार रणजित निंबाळकर हे रात्री उशिरापर्यंत माळशिरस-अकलूज भागात भेटीगाठी आणि बैठकीत व्यस्त होते . एकंदर मोहिते पाटील गेल्याने त्यांचे विरोधक अशी ओळख असणाऱ्या उत्तम  जानकर  यांना महत्व प्राप्त झाले असून जानकर यांच्यासोबत देखील फडणवीस यांची बैठक झालेली आहे . येत्या दोन दिवसात उत्तम जानकर माळशिरस येथे मेळावा घेऊन निर्णय घेणार असून यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकलूज किंवा माळशिरस येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Kalyan Loksabha: कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंना दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही; गणपत गायकवाडांच्या कार्यालयात ठराव मंजूर