जालना : महायुती सरकारच्या आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ नाराज झाले असून आजच त्यांनी नाशिकमधील आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी देखील आपली नाराजी उघड केली, आता मराठा आरक्षणाचे लढवय्ये उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर (Chhagan bhujbal) जोरदार हल्लाबोल केला. भुजबळ कुठेही जात नाहीत ते दुसरीकडे कुठे गेले तर जेलमध्ये जातील. पण, ते शरद पवारांची राष्ट्रवादीही फोडणार. शिवसेना फोडली, शरद पवारांचाही पक्ष फोडला. आता ते फडणवीस यांच्या अंगावर ओबीसी घालतील. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ओबीसींवर अन्याय झाला असं ते म्हणतात. मग, गेल्यावेळी मंत्री नव्हते का? किती दिवस ओबीसींचे खाता असे म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले.
नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडाळाच्या विस्तारात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र, दिग्गज नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांना देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे, त्यांनी आपली नाराजी उघड केली. नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते विधिमंडळात गेले होते. मात्र, नागपूरहून नाशिकला परतले असून आता मी अधिवेशनाला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आज मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, यावेळी देखील नाराजी बोलून दाखवली. आता, भुजबळ यांच्या नाराजीवर मनोज जरांगेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, ते कुठेही जात नाही, दुसरीकडे गेले की जेलमध्ये जातील, अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांना डिवचलं.
ते आदीपासून असंच आहे, त्याच्याबद्दल विचारायला नाही पाहिजे तो कामातून गेलेला आहे. तो राजकीय विषय, द्यायचं का नाही द्यायचं ते सरकारचा विषय आहे, मी त्याला देऊ नको म्हटलं का? असा प्रतिसवालच जरांगे यांनी पत्रकारांना केला. तसेच,स्वतः ला ओबीसीचा नेता म्हणत असतो ओबीसी नाराज झालेला नाही. कुठवर ओबीसीच्या जीवावर तू खातो? तू राजकारणी माणूस. तुला काही नाही दिलं की ओबीसींना काही नाही दिलं. आपलं वय काय, किती ज्येष्ठ आहोत आपण, सर्व जाती धर्माला धरुन राहिलं पाहिजे. हा मंत्री झाला की एका जातीचे काम करतो, गोरगरीब ओबीसीला काय दिलं? आणि इतर झालेले ओबीसी नाहीत का? तू एकटाच ओबीसी आहेस का?. बाकीचे ओबीसी नेत्यांना दिलं आहे ते ओबीसी नेतेच आहेत. तू कोणता ओबीसी नेता लागून गेला, तू ओबीसींना काय दिलस भांडण लावण्या पलीकडे? अशा प्रश्नांची सरबत्ती देखील जरांगे यांनी भुजबळांवर केली.
तेव्हा अजित पवार, शिंदे-फडणवीस गोड होते
आपण गरीब माणूस, तो ओबीसींना वेठीस धरतो, यापूर्वी मंत्रिपद दिलं होतं, तेंव्हा अजित पवार गोड होते,शिंदे, फडणवीस गोड होते. पण, आता वाईट झाले. मी येवल्यात गेलो असतो तर रपक्यात पडलं असतं. एवढं वय झालं, त्याला डोकंच नाही. एवढ्या मोठ्या दर्जाचा खाती सांभाळलेला म्हणतो ओबीसीवर अन्याय झाला, कोणीही नाराज नाही गपचूप घरी झोप. लय दलिंदर आहे तो, भाजपचा कार्यक्रमच करणार आहे. भाजप आणि मराठ्यांचं काहीच नव्हतं, धनगर-मराठ्यांमध्ये नाराजी त्यानेच पोहोचवली, बळच भांडण विकत घेतो, असेही जरांगे यांनी म्हटले.
तर याला जेलमध्ये टाकून देतील
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही राहून काय करेल, कुठे जाईल, कुठे गेले तर त्याला जेलमध्ये टाकून देतील, असेही जरांगे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर तो ओबीसी घालणार, मग फडणीस साहेब त्याला मध्ये (जेल) फेकून देणार, मग बस बेसन भाकर खाऊन, अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला.
हेही वाचा
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?