Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिलं. "देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी भाजपने विरोधकांची पाटण्यातील बैठकीवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "मी पाटण्याला गेलो होतो, पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे. सूरज, शिवसैनिक आणि हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कुणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहित. पण मी माझं कुटुंब जपणार. त्यामुळे परिवार बचाओ बोलू नका."
उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस लिहितात की, "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर...
➡️ मुंबईला कुणी लुटले यावर...
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर...
➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर...
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर...
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या...
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…"
हेही वाचा