मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. त्यामुळे, गेल्या 5 वर्षांपासून भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार, खासदार ज्या क्षणाची वाट पाहत होते, ज्या दिवसाकडे डोळे लावून बसले होते, अखेर तो क्षण आला, तो दिवस उजाडला. त्यामुळे, भाजपच्या (BJP) सर्वांनाच आनंद झाला आहे. औसा मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी असलेल्या अभिमन्यू पवार यांनी या क्षणाची वाट पाहिली होती, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असा नवस देखील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला केला होता. त्यानुसार, इच्छापूर्ती झाल्याने आता आमदार अभिमन्यू पवार आपला नवस फेडणार आहेत. औसा ते तुळजापूर असा पायी प्रवास करत ते देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आज सोनियाचा दिन आहे. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही पाच वर्षापासून करत होतो. देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी म्हणून मी 25 वर्ष काम केले, या काळात नेता, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशा सगळ्या रोलमध्ये देवेंद्र फडणीस यांनामी बघितलं आहे. देवेंद्र फडणवीस अस्सल 24 कॅरेट सोनं आहे, किती संयम त्यांनी ठेवावा, किती सहन करावं. जे टोमणे, ज्या शिव्या देवेंद्र फडणीस यांनी मागील पाच वर्षात खाल्ल्या, त्यातून निघालेले हे मंथन आहे, अशा शब्दात अभिमन्यू पवार यांनी आजच्या दिवसाचं वर्णन केलं आहे. मी तुळजापूरच्या देवीला नवस केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ दे... आता तो नवस पूर्ण झाला आहे, आणि तो नवस फेडण्यासाठी मी औसा ते तुळजापूर चालत जाणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.
आज तीन नेते घेणार शपथ
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं चांगलं बॉण्डिंग आहे. सगळे समाधानी आहेत, आज तिघे नेते शपथ घेतील आणि आज हे तिघेच नेते रात्री बसून मंत्रिमंडळ संदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती देखील अभिमन्यू पवार यांनी दिली.
एकनाथ शिंदे अन् अजित पवार हेही शपथ घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानावर पार पडत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते व अनेक राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.