नागपूर: 'मी पुन्हा येईन' हे वाक्य निर्विवादपणे प्रत्यक्षात उतरवत पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी विधानसभेतील आपले पहिले भाषण केले. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे सर्व विषयांना हात घालत विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासोबतच राज्यातील नागरिकांना आश्वस्त केले. तसेच आपली जात ही महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने गौण मुद्दा असल्याचे सांगत जनतेने आपले नेतृत्व कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता स्वीकारल्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केला. (Maharashtra Assembly Winter Session 2024)
गेल्या पाच वर्षांत व्यक्तिगत मला आणि माझ्या कुटुंबाला ज्याप्रकारे टार्गेट करण्यात आले, महाराष्ट्रात हा रेकॉर्ड असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहा-सात लोक फक्त माझ्यावर बोलायचे. पण त्यांचे आभार, ते माझ्यावर बोलत राहिल्यामुळे लोकांच्या मनात माझ्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. जनतेने पाच वर्षांचे माझे काम बघितले होते. जात, धर्माचा विचार न करता सर्वजनहिताय , सर्वजनसुखाय, असे काम मी केले होते. जात जेवढी राजकारण्यांच्या मनात आहे, तेवढी जनतेच्या मनात नाही, हे यंदाच्या निवडणुकीने दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ज्यांनी ज्यांनी वेगळं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, ते उद्ध्वस्त झाले, समाज एकसंध झाला, सगळ्यांना महायुतीला मतदान केले. गेल्या 30 वर्षांत 50 टक्के मतं कोणाला मिळाली नाहीत, ती महायुतीला मिळाली. मी म्हटलं होतं, मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतं, माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे. याचं श्रेय माझं नाही, माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं आहे. मी एवढंच म्हणेन की, 'आंधीयो मे भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पुछ लेना मेरा पता मिल जाएगा', असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार, देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
मी सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. एकही योजना बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिवेशन संपताच डिसेंबरचा हप्ता जमा होईल. कोणतेही नवे निकष नाहीत. पण काहींनी चार-चार खाती उघडली आहेत. कोणी गैरफायदा घेत असेल तर ते रोखणे आपली जबाबदारी आहे. शेतकरी, तरुण आणि वंचितांना दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या शुभेच्छा
देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी फडणवीसांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत मिश्कील टिप्पणी केली. दादा तुम्हाला लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरुर एक दिवस मुख्यमंत्री व्हा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा