मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आजच्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी भाजपाची विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी कशी असेल, याचे संकेत दिले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या भाषणात, मराठा आरक्षण, विरोधकांची प्रचारनीती अशा वेगवेगळ्या विषयांना हात घातला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थैट मैदानात उतरून विरोधकांच्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे. 


1) विरोधक लबाड आहेत


आज भाजपाचा विचार गावागावात पोहोवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. विरोधक लबाड आहेत. आपण लाडकी बाहीण योजना आणली. जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. आपल्या सरकारने हे काम केले आहे. विरोधक नाटकी आहेत. ते सभागृहात सांगतात ही योजना खोटी आहे. ही योजना चालू शकणार नाही. पण गावात सर्वांत पहिलं पोस्टर यांचंच आहे. ते या योजनेच्या विरोधातही जात आहे. 


2) भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवर उतरलं पाहिजे


मी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, त्यांनी जमिनीवर उतरलं पाहिजे. आपली मशीनरी जमिनीवर उतरली पाहिजे. मताभगिनींना मदत करून लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरून घेतले पाहिजेत. 


देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण भाषण



3) महिलांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न


महाविकास आघाडीच्या लोकांनी एक योजना आखली आहे. हे लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि लाडकी बहीण योजेसाठी त्यांचे फॉर्मच देणार नाहीत. महिलांच्या मनात सरकारविरोधात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना यशस्वी कशी होईल हे आपण पाहिलं पाहिजे. 


4) आता मुलींना मोफत उच्चशिक्षण 


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने मुलींना फीमध्ये 100 टक्के सवलत देण्याचं काम केलं आहे. आता माझ्या लहान मुलींना, बहिणींना कॉलेजमधून शिक्षण घेण्यासाठी स्वत:च्या घरातून एक रुपयाही द्यावा लागणार नाही. 


5) 2013 ची सिलिंडरची किंमत दाखवल्यावर गप्प


महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना आम्ही आणली. सिलिंडरच्या किमती महागल्या असे ते म्हणतात. पण 2013 सालच्या सिलंडरच्या किमती दाखवल्या की ते गप्प बसतात. पण आपण असे लोक आहोत की आपण उत्तर देत नाहीत. आपल्या प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो. 


6) आता मैदानात उतरा, बॅटिंग करा


मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. आज मी तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करा. मैदानात उतरा पण अट एकच आहे. की हीट विकेट व्हायचं नाही. सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलतात. काही लोक असे आहेत की ते बोलल्यावर त्याचीच उत्तरं चार दिवस द्यावी लागतात. आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा. 


7) लग्नात गेले तरीही योजना सांगा


प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे. प्रत्येकाला सरकारच्या योजना सांगिल्याच पाहिजेत. कोणाच्या लग्नाला गेलात तरीही या योजना सांगा. कारण पब्लिक मेमरी फार शॉर्ट असते. चांगल्या गोष्टी इको होत नाहीत. त्यामुळे या योजना पुन्हा-पुन्हा सांगणे गरजेचे आहे. 


8) स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की..


मी निश्चितपणे सांगतो की आपण ताकतीची तयारी केली आहे. आता चिंता करायची नाही. आता फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याची आपण करत आहोत. पण मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी खूप आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की सगळे भारतीय थुंकले तरी इंग्रज वाहून जातील. अशाच प्रमाणे आपल्यातील प्रत्येकाने सोशल मीडियावर रोज एक पोस्ट केली तरी फेक नरेटिव्ह  संपून जाईल. 


9) आजची लढाई ही टेक्नॉलॉजीची आहे


दुर्दैवाने आमचे लोकप्रतिनिधीही या पोस्ट करत नाहीत. लोकप्रतिनिधींची सोशल मिडिया हँडल बघा. अरे बघा आपण जमिनीवरची लढाई लढतोय. पण सोबतच ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे. तुमच्याबाबतीतला खोटा नरेटिव्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्याला उत्तर दिलं नाही तर आपण मुकाबला करू शकणार नाहीत. 


10) समाजा-समाजात दुफळी निर्माण झाली


तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेतलं तर परिवर्तन होईल. राज्यात विचित्र स्थिती आहे. समाजा-समाजात दुफळी तयार झाली आहे. दुर्दैवाने राज्यातील काही नेत्यांना असं वाटतं की हा समाज एकमेकांविरोधात उभा राहिला आपण निवडून येऊ शकतो. त्यामुळे काही राज्यकर्ते पेट्रोल टाकण्याचं काम करत आहेत.  


11) ...तेव्हा का आरक्षण दिलं नाही


मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. आरक्षणाची लढाई 1982 साली चालू झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वत:ला गोळी घालून घेतली. 1982 सालापासून अनेक सरकारे आली. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा मराठा आरक्षण का दिलं नाही. 


12) आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं


तुम्ही चार वेळा रेकॉर्डवर सांगितलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. आता मतांसाठी दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जोपर्यंत आम्ही होतो तोपर्यंत आम्ही आरक्षण टिकवलं. दुर्दैवाने महविकास आघाडीचं सरकार आलं अन् आरक्षण गेलं. आता आम्ही पुन्हा मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं.


हेही वाचा : 


आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट भिडण्याचा आदेश; विधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन!