Devendra Fadnavis on Missing Link: मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर काही लोकांनी सरकारवर अवाजवी टीका केली. एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील. त्यांना खोटं बोलायला लाजही वाटत नाही. मात्र, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सरकारने 18 तासांत मिसिंग लिंकवरील (Connecting Link) वाहतूक पूर्ववत केली.  भविष्यात मिसिंग लिंकवरुन आमच्यावर टीका करणारे शिल्लक राहणार नाहीत. पण 10 वर्षांनी मिसिंग लिंक असेल, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं नाव असेल. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करु नका, अशा आक्रमक भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ते बुधवारी विधानसभेत बोलत होते. (Mumbai Pune Missing Link)

Continues below advertisement

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकवरुन टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांना कुत्रा नाही विचारत, ते आज सोशल मीडियावर येऊन सगळ्यांना शिव्या देत आहेत. असे भाड्याचे तट्टू मिसिंग लिंकबाबत पैसे घेऊन सोशल मीडियावर लिहत होते. या सगळ्यांना मी एकच सांगतो की, महाराष्ट्राचा अपमान कराल तर मी सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले. मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याच्या घटनेने आपण काही गोष्टी शिकलो. पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दर कशी कोसळू शकते, हे आपल्याला लक्षात आले. त्यामुळे आता आपण आयआयटीमधील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नव्या उपाययोजना करणार आहोत. जेणेकरुन कदाचित पुढच्यावर्षी अशी घटना घडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली. कोकण रेल्वेही तशीच सुरु केली. तेव्हाही ही रेल्वे चालू शकणार नाही, असे म्हटले जायचे. मात्र, मधू दंडवते नावाच्या माणसाने हिंमत दाखवून कोकण रेल्वे सुरु केली. त्यानंतर सतत 15 वर्षे पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळत होती. आपण प्रत्येकवेळी शिकायचो आणि काम करायचो. त्यावेळी घाबरुन कोकण रेल्वे सुरुच केली नसती तर आज काय अवस्था असती? मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. आघाडी सरकारमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 पानी पत्र लिहून 14 कारणं देऊन, मिसिंग लिंक होऊ शकत नाही, असे सांगून ती फाईल बंद केली. मात्र, आम्ही अधिकाऱ्यांशी आणि तज्ज्ञांशी बोललो, त्यांनी मिसिंग लिंक उभारणे शक्य असल्याचे सांगितले. 

Continues below advertisement

आपण हे करुन दाखवलं. ही फक्त मिसिंग लिंक नाही तर इंजिनिअरिंग मार्व्हल आहे. हा भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रीज आणि जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. ज्याठिकाणी 170 किमी प्रतितास वेगाने वारा वाहतो, तिकडे आपण मिसिंग लिंक बांधली. यामुळे घाटातील सर्व ट्रॅफिक संपले. मिसिंग लिंकवर जी दुर्घटना घडली, त्यामध्ये वरुन दरड कमानीवर कोसळली. मग खाली ढिगारा आला. त्यामुळे बोगद्याला काही अडचण आली नाही. प्रवाशांनी बोगद्यातील इमर्जन्सी बटण दाबल्यानंतर तीन मिनिटांत तिकडे क्रेन आली. प्रवाशांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्ही वाचलो. पण काहींनी लगेच पाणी पडतंय, असे व्हिडीओ दाखवायला सुरुवात केली. जणू काही कनेक्टिंग लिंक तुटली, 7000 कोटी पाण्यात गेले, अशी टीका सुरु झाली. मात्र, या सगळ्यांच्या थोबाडावर टिच्चून आपण 18 तासांत मिसिंग लिंकवरील ट्रॅफिक सुरु केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'