Devendra Fadnavis on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) सध्या राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत काही पुरावे सादर कडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर धनंजय मुंडे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. 


अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल : देवेंद्र फडणवीस


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडे त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलो आहे. सकाळी आमची कॅबिनेटमध्ये भेट झाली होती. धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहे, त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात, मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


काय म्हणाले होते अजित पवार? 


दरम्यान, अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटलंय की, अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली, ती मी पाहिली. जी काही घटना बीडमध्ये घडली आहे, त्यासंबंधी चौकशी सुरु आहे. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. आणखी काही नावे आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. पण जर संबंध असेल तर निश्चित कोणाला पाठीशी घातले जाणार नाही. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांसह आमची आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते.



आणखी वाचा 


Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?