मुंबई: भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले होते. एकनाथ खडसे यांनी 'एबीपी'च्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना याबद्दल भाष्य केले होते.
एकनाथ खडसे यांच्या मुलाखतीनंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत. नाथाभाऊंचे कट्टर विरोधक असणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याविषयी भाष्य केले आहे. एकनाथ खडसे मुलाखतीत काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजप एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी आयोजित करणार, हे पाहावे लागेल. तसेच एकनाथ खडसे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारणार का, हेदेखील बघावे लागेल.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
मी भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर फुली मारुन टाकली आहे. इतके दिवस मला बाहेर राहणं, मी प्रवेश घेतो असं कधी म्हटले नव्हते. मला प्रवेश घ्या, असं सांगण्यात आलं, त्यामुळे मी पुन्हा भाजपमध्ये गेलो. मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन मी भाजपमध्ये गेले. माझ्यासारख्या माणूस ज्याने 40 वर्षे भाजपचं काम केलं, इतकी वर्षे काम करुन मी बहुजनांना भाजपशी जोडलं, महाराष्ट्र पिंजून काढला अनेकदा, चेष्टा सहन केली. इतकं सगळं केल्यानंतर भाजपमध्ये मला प्रवेश द्या, ही विनंती करणं माझ्यादृष्टीने अपमानास्पद आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती; खडसेंचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी मला काही वर्षांपूर्वी राज्यपाल पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी 'माझा कट्टा'वर केला होता. मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. मी म्हटलो राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते. साधारण ही गोष्ट 2019 सालातील आहे, असे नाथाभाऊंनी सांगितले होते.
आणखी वाचा
देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती: एकनाथ खडसे