नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाकिस्तानला (Pakistan) चांगलाच धडा शिकवला आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशवाद्यांच्या हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या जीवाचा बदला भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. 6 ते 7 मे 2025 रोजी (बुधवारी) मध्यरात्री 1.05 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर (Operation sindoor) राबवलं. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि एअरफोर्सच्या विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी, परराष्ट्र सचिव हेही पत्रकार परिषदेत होते. देशातील महिला भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना महिला सैन्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातच भारताने घरात घुसून मारलं. त्यामुळे, देशभरातून या हल्ल्याचं कौतुक आणि आनंद व्यक्त होत आहे.
एकीकडे सैन्य दलातील महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय महिला जगात भारी असल्याचा संदेशही या हल्ल्यातून दिला आहे. त्यामुळे, सैन्य दलातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, किंवा भरतीसाठीचं श्रेय तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार (Sharad pawar) यांना देत राष्ट्रवादीने श्रेयवादाची लढाई सुरू केल्याचं दिसून येत आहे.
सन 1991 साली शरद पवार यांना संरक्षण खात्याची जबाबदारी मिळाली. त्या कार्यकाळात त्यांनी महिलांना भारतीय संरक्षण दलात स्थान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी सुरुवातीला तिन्ही दलांचे प्रमुख तयार नव्हते. पण, पवार साहेबांची दृष्टी काळाच्या पलिकडची होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व केले. त्यांचे श्रेय जाते फक्त आणि फक्त पवार साहेबांना ! असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ऑपरेशन सिंदूरनंतर आता श्रेयावादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वत्र भारतीय सैन्य दलाचं कौतुक होत असून भारतीय सैन्य दलाच्या धाडसाला आणि शौर्याला सलाम केला जात आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे. त्यातच, आता सैन्य दलातील महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या नेत्यांना श्रेय देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसून येते. जय हिंद सावित्रीमाईंच्या लेकींनो, असेही राष्ट्रवादीने बॅनरवर म्हटले आहे.
शरद पवारांकडून मोदी सरकारचे अभिनंदन
दरम्यान, ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली, असे ट्विट शरद पवारांनी केले आहे. त्यामुळे, शरद पवारांनी स्वत: केंद्र सरकारचं अभिनंदन करत त्यांना श्रेय दिल्याचं दिसून येत आहे.
दिल्ली की गद्दी पर बैठे मोदीजी है - राणा
मी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांचं अभिनंदन करते. पाकिस्तानला मी सांगते की, तुम्ही भारतीयांना येऊन मारून गेले. पण आम्ही तुमच्या घरात घुसून अश्यावेळी मारले, जेव्हा आम्ही देशवासी पंतप्रधान यांच्या राज्यात शांत झोपलो होतो, असे भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. तसेच,
घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है, ओर इस देशमे दिल्ली की गद्दी पर हमारे मोदीजी बैठे हे, समझे बेटा पाकिस्तान
अशी शायरी देखील नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच, ये तो अभि शुरुवात हे पिक्चर अभि बाकी हे पाकिस्तान असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.