Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वडाळा अँटॉप हिल येथे सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला होता.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणजे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस, ज्याला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणताय ती बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर फडणवीसांनी ट्वीटरवरुन इशारा दिला आहे. 


शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते 


देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर लिहितात, हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही. हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत.


जशास तसे उत्तर दिले जाईल


दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल , असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?


मुंबई देशातील सर्वांत जास्त कर भरणारी नगरी आहे. आर्थिक राजधानी आहे. हे त्या मोदी -शाहांच्या पोटात दुखतय. मुंबई कशी असू शकते. अहमदाबाद असायला पाहिजे. जे उद्योग आपल्याला महसूल आणि कर देत होते, ते सर्व ऑफिस गुजरातला नेले. सिमेंटच्या कंपन्यांचे ऑफिसही यांनी गुजरातला नेले. गुजरातबद्दल असुया किंवा द्वेष नाही. उद्या इंडिया आघाडीचे सरकार आले तरी गुजरातच्या हक्काचे जे काही असेल ते नक्की देऊ, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : ज्याला कुठली तरी खोली म्हणता ती बाळासाहेबांची खोली, नाक रगडत आलेल्या अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार