Pune Land Scam: पुण्यातील बोपोडी भागातील जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. या गैरव्यवहारात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा संबंध असल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर (Mahayuti Government) टीकेची प्रचंड झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी, असा अर्ज केला आहे. हे झालं तरी जे गुन्हेगारी प्रकरण दाखल झाले आहे, ते संपणार नाही. त्यासंदर्भात ज्या काही अनियिमतता असतील, त्याबाबत कारवाई होईल. माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही (Ajit Pawar) पूर्णपणे सहमत असतील. त्यामुळे अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात अजित पवार यांची पाठराखण केली आहे. अजित पवार यांनी तेव्हाच थांबवलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. पण बऱ्याचदा कामाच्या व्यापात गोष्टी राहून जातात. अनेक निर्णय परस्पर होतात. आता आपण त्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा स्वत: मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे, त्यानुसार चौकशी होऊन द्यावी. अजित पवार यांचा राजीनामा मागण्यात काहीही अर्थ नाही. विरोधकांना एकच काम आहे, ते काहीही झालं तरी राजीनामा मागतात. राजीनामा मागण्यापेक्षा वास्तव समोर आल्यावर जी मागणी करायची आहे, ती करा, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.
Ajit Pawar on Bopodi Land scam: अजित पवारांचा 24 तासांत यू-टर्न
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या एका वक्तव्यावरुन घुमजाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांनी हा घोटाळा समोर आल्यानंतर 6 नोव्हेंबरला यासंदर्भात म्हटले होते की, माझा अजित पवार म्हणून त्या गोष्टीशी दुरान्वयाने संबंध नाही. मागे एकदा तीन-चार महिन्यांपूर्वी ही गोष्ट माझ्या कानावर गोष्ट आलं होतं की, अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय. तेव्हा मी सांगितलं, असलं चुकीचं केलेलं मला चालणार नाही. अशा चुकीच्या गोष्टी करु नका, अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे अजित पवार यांना या जमीन गैरव्यवहाराची आधीपासूनच कुणकुण होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी घुमजाव केले. अजित पवार यांनी म्हटले की, आजपर्यंत 35 वर्षांच्या राजकीय जीवनात मी. कधी नियम सोडून काम केलं नाही. मागे माझ्यावर 2009-10 ला आरोप झाले होते, पण ते आरोप सिद्ध झाले नाहीत. तेव्हा श्वेतपत्रिकाही काढण्यात आली होती, असे अजित पवार यांनी म्हटले.
Pune Land Scam: नेमकं प्रकरण काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या व्यवहारांसाठी 21 कोटी रुपयांची स्टँम्प ड्युटी भरणे अपेक्षित असताना मुद्रांक शुल्क म्हणून केवळ 500 रुपये भरुन हा व्यवहार झाला होता. सरकारी नियमांना पायदळी तुडवत जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के मालकी आहे. त्यामुळे पार्थ पवार अडचणीत आले आहेत.
आणखी वाचा
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी