MLA Sanjay Gaikwad slaps canteen staff: आमदार निवासातील कँटिनमध्ये निकृष्ट भोजन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. याप्रकरणात पोलिसांनी निश्चित चौकशी केली पाहिजे. त्यासाठी कोणीही तक्रार करायची गरज नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस कारवाई करतील. गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे, त्यानुसार कारवाई होईल. किती जोरात मारले आहे, यावर गुन्ह्याचे स्वरुप ठरते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे आता पोलीस स्वत: पुढाकार घेऊन संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संजय गायकवाड यांनीदेखील स्वत:च्या कृतीचे समर्थन केले होते. माझा मार्ग चुकला तरी मी जे केले त्याचा पश्चाताप नाही. किंबहुना मी मारहाण केल्यामुळेच निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या कँटिनवर कारवाई झाली. मी फक्त जराशी मारहाण केली. त्यामुळे एनसी होऊ शकते. हा फार मोठा गुन्हा नाही. मलाही कायदा माहिती आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देणार आहे. त्यांना मी दोषी वाटत असेन तर मी ते देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले होते.

Jan Suraksha Bill: जनसुरक्षा कायद्यामुळे शहरी नक्षलवादाला चाप बसेल: देवेंद्र फडणवीस

जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाले, याचा मला आनंद आहे. हे विधेयक मंजूर होताना सभागृहात झालेल्या चर्चेला मी उत्तर दिले आहे. हे विधेयक पारित करताना लोकशाही पद्धतीचा अवलंब झाला. 26 लोकांच्या संयुक्त समितीने लागोपाठ बैठका घेऊन अहवाल दिला. हा अहवाल तयार करताना 12 हजार बदल सुचवले गेले, ते अंमलात आणण्यात आले. जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीच्या विरोधात नाही. हे विधेयक आंदोलनाचा अधिकार काढून घेणारे नाही.

हे विधेयक लोकशाही आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर घाला घालणारं नाही. नक्षलवादी चळवळ आणि संबंधित फ्रंटल संघटना आहेत, त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी हे विधेयक आहे. यापूर्वी आपल्याकडे तशा तरतुदी नसल्याने इतर राज्यांनी ज्या संघटनांना बॅन केलेय, त्या महाराष्ट्रात राजरोसपणे सुरु होत्या. ज्या संघटना संविधान उलथवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर कारवाईसाठी हे जनसुरक्षा विधेयक तयार करण्यात आले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

साऊथ इंडियन लोकांनी डान्सबार, लेडीज बारने महाराष्ट्र नासवला, विरोधकांना त्यांचा पुळका कशाला; संजय गायकवाडांचा अजब युक्तिवाद