Maharashtra Legislative Council Election 2024 मुंबई: विधान परिषदेसाठी (Maharashtra Legislative Council Election) उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी कोणीच मागे न घेतल्याने 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान महायुतीच्या गटातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 


विधानपरिषद निवडणूकीसाठी महायुतीची महत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मत कशी द्यायची यावर देवेंद्र फडणीस महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. आपापला उमेदवार आणण्याऐवजी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदानाचा पॅटर्न निश्चित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


2022 सारखा देवेंद्र फडणवीसांचा 'मॅजिक पॅटर्न'?


2022 च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मॅजिक केली होती. आता तोच मॅजिक पॅटर्न पुन्हा चालवण्याची मुख्य जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे 2022 सारखी देवेंद्र फडणवीसांचा जादू चालणार की नाही, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.


महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार-


विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले असून विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. 


पक्षीय बलाबल काय?, जाणून घ्या-


महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे.  प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. 11 MLC चा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे.


संबंधित बातम्या:


Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?


Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?