मुंबई : प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही, लोक मरत असताना, उपाशी असताना घोटाळे करत होता. बॉडी बॅगचा घोटाळे करणारे तुम्ही कफन चोर आहात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोना काळात विकसित राष्ट्रांचा लस घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तो दबाव पंतप्रधान मोदींनी झुगारून दिला. पूर्वी 30 वर्षे भारताला लस मिळत नव्हती. जगात तीन ते चार देश लस तयार करू शकले, त्यातील एक भारत  आहे. मोदींच्या नेतृत्वात कोरोना लस तयार झाली. उद्धवजी 'तुमको मिरची लगी तो मै क्या करू, त्या काळात तुम्ही खिचडी, कफन चोरी करत होता, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. मुंबई भाजपच्या वतीने दादर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  


140 कोटी भारतीय जिवंत आहेत, तर यांना मिरची


मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना संधी दिली आणि लस तयार करून घेतली ती लस मिळाली म्हणून आज 140 कोटी भारतीय जिवंत आहेत, तर यांना मिरची. यांना लस म्हणजे लसूण वाटते. तुमच्या घोटाळ्यांची मालिका आम्ही काढणार आहोत. अभी तो शुरुवात हुई है आगे आगे देखिये होता है क्या. आज या देशाला कणखर नेतृत्व हवं आहे. देशात गुंतवणुकीची संधी आहे. भारताकडे जग आकृष्ट होत आहे. भारतामध्ये महाराष्ट्र राज्य इन्वेस्टर फ्रेंडली आहे. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताची इकॉनोमी फाईव्ह ट्रिलियन होईल. महाराष्ट्र वन ट्रिलियनची इकॉनॉमी आम्ही सोबत करू, असं म्हणत मुंबईतील महायुतीचे सहा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांचे मालक


बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील पण विचारांचे मालक एकनाथ शिंदे आहेत. विचारांना जिवंत ठेवण्याचे, हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने केलं आहे. भारताचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राने प्रगती केली. देशाच्या जीडीपीतील 15 टक्के जीडीपी महाराष्ट्रात तयार होतो. देशातील वस्तू उत्पादनामध्ये 20 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. निर्यातीमध्ये 22 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. सर्वात जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. या देशाला चालवण्याचे काम आर्थिक राजधानी म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई करत आहे, असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.


बाळासाहेबांचे नाव घ्यायचं आणि विचारांशी प्रतारणा


उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार काँग्रेसच्या वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे. तुझ्या पंजाचे बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यावर वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? खुर्ची करता हा ऱ्हास आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांशी पूर्णपणे प्रतारणा करायची. बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत. विचारांना जिवंत ठेवण्याचे, हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने केले आहे.