पालघर : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, त्यांना डहाणूपर्यंत येऊ देणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी नाव न घेता बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांना दिला. तर हितेंद्र ठाकुर यांनीही पलटवार केला. तुम्ही मोदींच्या नावे मतं मागता, मग इथला खासदार फक्त बोट वर करण्यासाठी हवाय का असा सवाल त्यांनी विचारला. 


डहाणूमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांना इशारा दिला. वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला.


नागरिकांची दिशाभूल करून भाजप सत्तेत, हितेंद्र ठाकुर यांचं प्रत्युत्तर 


देवेंद्र फडणवीस यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर केलेल्या टीकेला खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नसतो अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी हितेंद्र ठाकूर यांवर टीका केली होती . यावर आता हितेंद्र ठाकूर यांनी पलटवार केला. तुम्ही फक्त मोदींच्या नावावर मत मागता, मग इथले उमेदवार फक्त बोट वर करण्यासाठी हवे आहेत का? असा सवाल उपस्थित करत 2014 आणि 2019 साली देशातील नागरिकांची दिशाभूल करून भाजप सत्तेत आल्याचा पलटवार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


चिंतामण वनगा आणि विष्णू सावरा यांचे दोघांचे सुपुत्र या व्यासपीठावर आहेत त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. या निवडणुकीत आत्ता दोन गट निर्माण झाले आहेत. पांडवांची फळी आपण तयार केली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि पक्षांची खिचडी आहे. आमचे प्रधानमंत्री ठरलेले आहेत. तुमच्याकडे कोण आहेत? यांना नेताही नाही, नितीही नाही, नियतही नाही. विरोधकांकडे इंजिनच आहे, त्याला डब्बे नाहीत.तिकडे सर्व जण बोलतात मी इंजिन आहे. 


वसई वाल्यांना वसईमध्येच निपटावून टाकू, त्यांना डहाणूच्या पुढे येऊच देणार नाही. राहुल गांधीच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया आणि प्रियंका यांच्यासाठी जागा आहे. उद्धव ठाकरेंच्याकडे आदित्य ठाकरेंसाठी तर शरद पवारांकडे फक्त सुप्रिया सुळे यांच्यासाठीच जागा आहे. 


ही बातमी वाचा: