मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर त्यावर सर्वच पक्षांकडून आढावा घेण्याचं काम सुरू आहे. भाजपनेही आपल्या आमदारांची बैठक बोलवून लोकसभेतील कामगिरीचा आढावा घेतला. स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसल्याचं सांगत तो दूर केला जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) सांगितलं. तसेच कधीकधी पराभव होतो, पण एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडू नका असा सल्लाही फडणवीसांनी भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांना दिला. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण बैठक दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यशाला अनेक बाप असतात, पण अपयशाची जबाबदारी कुणीही घेत नाही. कधी कधी पराभव होतो पण एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडू नका. यावेळी आपल्याला काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला. आपली मदत मित्र पक्षाला झाली, त्यांची आपल्याला झाली. आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे मित्र पक्षांना मदत केली. पण नॅरेटिव्ह तयार करण्याचे काम कोणीही करू नये. मी आपल्या प्रवक्त्यांना देखील बोललो आहे. एकमेकाला सोबत घेऊन जाणे हे महत्वाचे आहे. आता वेगवेगळी विश्लेषण करू नका.


जोपर्यंत महायुतीचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही


येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्रितपणे सामोरं जातील आणि जिंकतीलही असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, जोपर्यंत महायुतीचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


महाविकास आघाडीला फक्त दोन लाख मतं जास्त


महाराष्ट्रातील पॉलिटिकल अर्थमॅटीकमुळे आपण कमी पडलो असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की, माविआला राज्यात 43.9 टक्के मतं तर महायुतीला 43.6 टक्के मतं मिळाली. परिणामी त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले. राज्यात  माविआला 2 कोटी 50 लाख तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मतदान मिळाले. महाविकास आघाडीला केवळ 2 लाख मतदान जास्त आहे. मुंबईत त्यांना 24 लाख तर आपल्याला 26 लाख मतं मिळाली. खोटा नॅरेटिव्हला आपण रोखण्याची तयारी आपण केली. संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला की पहिल्या तीन टप्प्यात जागा कमी झाल्या.


लोकसभा निकालावरून महायुतीत धुसफूस? 


लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या. 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं ध्येय असलेल्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. त्यात भाजपला 9, शिवसेनेला 7 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं.


आतातरी सर्व्हे नावाचं भूत भाजपच्या डोक्यावरून उतरेल असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं. तर आपल्या नावाची घोषणा करण्यासाठी वेळ गेल्याने पराभवाचा सामना करावा लागल्याचं हेमंत गोडसे म्हणाले. सर्व्हेच्या नावाखाली आपली उमेदवारी कापली असल्याची खंत माजी खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केली.


ही बातमी वाचा :