मुंबई: मुंबईमध्ये स्वतःचे आलिशान घर असतानाही राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थानात राहत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत आपल्याकडे घर नसल्याने आपण सरकारी निवासस्थानात राहत असल्याची काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी माध्यमांना माहिती दिली होती. मात्र आता मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी येथील एन एस पाटकर मार्गावर वीरभवन इमारतीत घर असल्याचं समोर आलं आहे. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंकडून संबंधित घराचा उल्लेख केला आहे. वीरभवन इमारतीत 9 व्या मजल्यावर 902 क्रमांकाची मुंडेंची तब्बल 2 हजार 151 चौरस फुटांचं घर असल्याचं समोर आलं आहे. मंत्रिपद गेल्यानंतर देखील सरकारी निवासस्थानात राहत आहेत.
कृषीमंत्रीपद जाऊन तब्बल पाच महिने उलटले तरी...
धनंजय मुंडेंचे कृषीमंत्रीपद जाऊन तब्बल पाच महिने उलटले आहेत, तरीही धनंजय मुंडे यांनी सरकारचे 'सातपुडा' हे निवासस्थान रिकामं केलेलं नाही. मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळं बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी माध्यमांशी बोलताना दिलं होतं. अशातच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या या घराचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरामध्ये नाही, अशी माहिती आहे. यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत.
16 कोटींचं आलिशान घर वापराविना
गिरगाव चौपाटीजवळ एन.एस. पाटकर मार्गावरती 'वीरभवन' या 22 मजली इमारतीत नवव्या मजल्यावर 902 क्रमांकाचं घर आपलं असल्याचं मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलेलं आहे. डिसेंबर 2023 मध्ये धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे 16 कोटी 50 लाख रुपयांना हे घर खरेदी केलं होतं. प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी स्वतः 10 कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख आहे. या घरात सध्या कोणीही राहात नसून खरेदी केल्यापासूनच ते बंद आहे. दरम्यान मंत्रिपद गेल्यानंतर देखील सरकारी निवासस्थानात राहत असल्यामुळे मुंडेंना तब्बल 42 लाख रुपयांचा दंड त्यांना झाला आहे. पण दंडाची रक्कम माफ करण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात. मुंडे यांनी बंगलाही सोडलेला नाही वा कार रक्कमही भरलेली नाही, अशी माहिती एका मराठी वृत्तपत्राने दिली आहे. मुंबईत दुसरीकडे राहण्याची अन्य व्यवस्था नसल्याने आपण सरकारी बंगला सोडला नसल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे. मात्र गिरगावमधील त्यांची 16 कोटींचं आलिशान घर वापराविना असल्याचे समोर आले आहे.