Dadar Kabutar Khana: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना ताडपत्री टाकून पूर्णपणे झाकल्यानंतर आता जैन समाजाने कबुतरांना (Pigeons) खाणे घालण्यासाठी नवीन जागा शोधल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयाने (Mumbai HC) या परिसरात कबुतरांना खायला टाकू नये, असे स्पष्ट निर्देश देऊनही स्थानिक नागरिकांकडून हा आदेश धाब्यावर बसवला जात आहे. यापूर्वी फुटपाथवर पाच-पाच किलो धान्य टाकून ठेवणे किंवा कारच्या छतावर कबुतरांसाठी धान्याचा ट्रे ठेवणे, अशा युक्त्या स्थानिक जैनधर्मीय नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली होती. यानंतर आता स्थानिक नागरिकांनी कबुतरखान्यासमोरच्या जैन मंदिराशेजारी असणाऱ्या एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नव्याने कबुतरखाना सुरु केला आहे.
या इमारतीच्या छतावर कबुतरांसाठी धान्याची पोती रिकामी केली जात आहेत. त्यामुळे या इमारतीवर हजारोंच्या संख्येने कबुतरांचा थवा जमा होत आहे. याचा आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या परिसरात कबुतरं जमू नयेत म्हणून पालिकेने कबुतरखाना बंद केला होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी आता इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरु करुन न्यायव्यवस्था आणि प्रशासनाला आव्हान दिले आहे. दादरमध्ये हजारोंच्या संख्येने जमणाऱ्या कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे मोठ्याप्रमाणावर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात, अशी तक्रार अनेकांनी केली आहे. तरीही जैन धर्मीयांकडून न्यायालयीन आदेशाचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करुन जैन मंदिराशेजारच्या इमारतीच्या छतावर सुरु करण्यात आलेला कबुतरखाना तातडीने बंद करावा, अशी मागणी होत आहे.
Marathi Ekikaran Samiti: कबुतरखाना बंदीच्या समर्थनासाठी मराठी एकीकरण समितीला आंदोलनाची परवानगी नाकारली
दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन जैनधर्मीयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठी एकीकरण समितीने मैदानात उडी घेतली होती. दादर कबुतरखाना बंद व्हावा, या मागणीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून बुधवारी दादर परिसरात आंदोलन केले जाणार होते. मात्र, काल रात्रीच मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस धाडण्यात आल्या. पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. 6 ऑगस्ट रोजी जैन आणि मारवाडी समाजाने पोलिसांनी धक्काबुक्की केली. सार्वत्रिक मालमत्तेच नुकसान केलं आहे. हजारो जण रस्त्यावर उतरले होते. सामान्य नागरिकांना त्यांनी वेठीस धरलं होते. याविरोधात मराठी माणसांनी काहीच करायचे नाही का, असा सवाल मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमख यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला जाळ्या का लावल्या? अखेर कारण आलं समोर...