Ajit Pawar On Vidhansabha Election मुंबई: महायुतीतील (Mahayuti) राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक काल मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 


महायुतीच्या सरकारच्या काळात अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी केली. आमच्या सरकारने कायमच महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या निर्णयांना पहिलं प्राधान्य दिलं आहे. येत्या काळात देखील राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. महायुतीच्या सरकारची दमदार कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आता तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यावर आहे, असं अजित पवार म्हणाले. 


विरोधकांनी चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला- अजित पवार


विरोधकांनी चुकीचा नॅरेटिव्ह पसरवल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. संविधान बदलले जाणार असल्याच्या चुकीच्या नॅरेटिव्हचा निवडणुकीत फटका बसला. पण आता विरोधकांचा हा नॅरेटिव्ह चुकीचा असल्याचं सिद्ध झालंय, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच आता मतदारांना कळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाला मोठ्या आदराचं स्थान मिळवून देण्याचं काम केलं, असं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्षांनी कितीही नकारात्मक प्रचार केला, तरी आपला प्रचार सकारात्मक असेल याची काळजी घ्या. मात्र विरोधकांकडून अपप्रचार केला जात असेल, तर त्याचा वेळीच प्रतिवाद करा. तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला जाऊया आणि पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी ताकतीने लढूया, असं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलं. 


मी फक्त दोन दिवस मंत्रालयात थांबणार- अजित पवार


अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त दोन दिवस मंत्रालयात थांबणार, उरलेले पाच दिवस महाराष्ट्राभर फिरणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तुम्ही देखील आगामी विधानसभेच्या तयारीला लागा. यामध्ये सगळे मंत्री देखील सहभागी होतील, अशी माहिती दिली. जर राष्ट्रवादीचा मंत्री असेल तर, त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटावं, पण यासोबतच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील भेटण्यासाठी वेळ राखून ठेवावा. त्याच्याही अडचणी आहेत, कामं आहेत. त्याचाही मानसन्मान ठेवायला हवा, अशा सूचाना अजित पवारांनी दिल्या. 


अर्थसंकल्पातील योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- अजित पवार


अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या योजना निवडणुकीपुरत्या नाहीत, हे जनतेपर्यंत पोहोचवायला हवं. आजपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सरकारने केलेली कामं आणि अर्थसंकल्पातील योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. फक्त विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचंय. मला महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचंय की लोकांना योजनांचे फॉर्म भरण्यासाठी आणि शक्य ती सर्व मदत करा. महायुतीतील घटक पक्षाचे कार्यालय लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा, असं अजित पवार म्हणाले.


संबंधित बातमी:


"जर कोणाला अडचण असेल, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार..."; महायुतीच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं