नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीतील 70 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून दिल्लीत सुरू असेलला राजकीय धुरळा शांत झाला असून सर्वांच्या नजरा दिल्ली विधानसभेच्या निकालाकडे लागल्या आहेत. दिल्लीत गेल्या 10 वर्षांपासून आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात शासनाचा कारभार करण्यात आला. मात्र, दिल्लीतील मद्यधोरण घोटाळा चांगलाच गाजला असून यावरुन विरोधी भाजपने (BJP) रान उठवलं होतं. मद्यधोरण घोटाळ्यावरुन आपचे नेते व मंत्री मनिष सिसोदिया व अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातही जावे लागले. त्यामुळे, यंदाच्या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच, मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून भाजपचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. या एक्झिट पोलनुसार, दिल्लीतील (Delhi) विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपला 44 ते 50 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर, आम आदमी पक्षाला केवळ 15 ते 25 जागा मिळू शकतात. मात्र, आप आदमी पक्षाने एक्झिट पोलनंतर प्रथमच किती जागा मिळतील, याचे भाकीत केले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य करताना, आम आदमी पार्टीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत आपला 50 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे गोपाल राय यांनी म्हटले आहे. पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर गोपाल राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. ''एक्झिट पोलच्या माध्यमातून माहोल बनविण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे. एक्झिट पोलच्या आधारे ऑपरेशन लोटसद्वारे निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, आमचे सर्वच उमेदवार मतमोजणीच्या तयारीला लागले आहेत. दिल्लीत आम्हीच सरकार बनवू, भाजपला खरा चेहरा उद्या सर्वांसमोर असेल'', गोपाल राय यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालासंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीत सत्तांतर होणार असून भाजपला 45 ते 55 जागा मिळतील, असा अंदाज आहे. एक्सिस माय इंडियाच्या सर्वेनुसार भाजपला 45 ते 55 जागा, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 15 ते 25 जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलनुसार दिल्लीत काँग्रेसला एकही जागा जिंकता येणार नाही. त्यामुळे, दिल्लीत यंदा सत्तांत होईल असा दावा एक्झिट पोलने केला आहे. सीएनएक्सच्या सर्वेनुसार, आपला 10 ते 19 जागा जिंकता येतील, भाजपला 49 ते 61 जागांवर विजय मिळू शकतो. इतरमध्ये 0 ते 1 जागा असा अंदाज आहे. तर, डीवी रिसर्चनुसार, आप 26 से 34, भाजपा 36 से 44 जागा जिंकेल असा अंदाज आहे.
भाजपकडूनही 50 जागा जिंकण्याचा दावा
दरम्यान, आप आदमी पक्षाने इथे तिसऱ्यांदा सरकार आम्हीच बनवू, असा दावा केला आहे. तसेच, 50 पेक्षा जास्त जागा जिंकू, असेही भाकीत केले आहे. तर, भाजपनेही आपण 50 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा केला आहे. मात्र, गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकीत दिल्लीत भाजपला दुहेरी आकडाही पार करत आला नाही. 2020 मध्ये भाजपने 8 तर, 2015 मध्ये केवळ 3 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, दिल्ली विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षाला 36 जागांवर विजय मिळवणे अपेक्षित आहे. त्यामुळे, आता सर्वांच्या नजरा 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत.
हेही वाचा
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड