मुंबई:  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माझा केवळ एकच प्रश्न आहेत. मला माहिती आहे की ते याचे उत्तर देणार नाहीत आणि तशी अपेक्षा देखील माझी नाही. मात्र त्यांना माझा केवळ एक सवाल आहे की, मनसुख हिरेनची हत्या (Mansukh Hiren Murder Case) होणार आहे, हे अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) माहिती होतं की नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. असा थेट सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुख यांना आव्हान दिले आहे. 


मनसुख हिरेनच्या हत्येच्या प्रकरणाबाबत सदनामध्ये मी का शंका घेतली? त्यावेळी मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आलं आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावं, ते यावर भाष्य करणार नाहीत. मात्र यावरचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला. ते माझा व्हिजन या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते. 


 जेलमध्ये असताना राज्यात मविआ सरकार, मग त्यांनीच त्रास दिला का?


अनिल देशमुख यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही. कारण खरं बोलायला विचार करावा लागत नाही. मात्र खोटं बोलण्यासाठी विचार करावा लागतो आणि सत्य हे कधी ना कधी समोर येतच असतं. याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर अनिल देशमुख यांनी नुकतेच एक ट्विट करून सांगितलं की मला जेलमध्ये प्रचंड त्रास झाला. मात्र, नोव्हेंबर 2022 मध्ये अनिल देशमुख जेलमध्ये गेले. त्यानंतर जवळजवळ 11 महिने ते जेलमध्ये होते. तर त्यातले आठ महिने राज्यात त्यांचे सरकार होते. मग जेलमध्ये त्यांच्या सरकारने त्यांना त्रास दिला का? हा माझा सवाल त्यांना आहे. 


....म्हणून अनिल देशमुख यांनी कपोलकल्पित आरोप


खरं म्हणजे अनिल देशमुख यांनी असे आरोप करायला आत्ताच का सुरुवात केली? मुळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट यांनी मिळून एक स्टॅटेजी तयार केली असून केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. भारतीय जनता पक्षाला रोखायचे असेल तर केवळ देवेंद्र फडणवीस वर टीका केली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून अनिल देशमुख यांनी कपोलकल्पित आरोप सुरू केले. त्यांच्यावर त्यांच्या सरकारमध्ये आरोप लावण्यात आले आहे. त्यावेळी कोर्टानेच पोलिसांना खडसावून सांगितलं की, पोलीस दबावाखाली काम करत आहेत. यावेळी मी विरोधीपक्ष नेता होतो. तर सत्तेत हे होते. त्यामुळे त्यांचे सरकार असताना यांच्याच सरकारने त्यांना त्रास दिला का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  


हे ही वाचा