मुंबई: भाजप हा महायुतीमधील शक्तिशाली पक्ष आहे. त्यामुळे भाजपचे नुकसान केल्याशिवाय महायुतीची ताकद कमी होणार नाही. काँग्रेसच्या कर्नाटकातून आणलेल्या एका स्ट्रॅटेजिस्टने मविआच्या नेत्यांना 'तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करा' असा सल्ला दिला आहे. त्या रणनीतीनुसारच मविआच्या नेत्यांकडून माझ्यावर वैयक्तिक हल्ले चढवले जात आहेत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते बुधवारी एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, मी विरोधकांचे आभार मानेन की त्यांनी मला नेहमी सेंटर स्टेजला ठेवले. विरोधी पक्षातील नेते सकाळपासून संध्याकापर्यंत माझ्यावर टीका करतात. त्यांनी लोकांना माझा विसरच पडून दिला नाही. त्यामुळे लोकांना वाटलं की देवेंद्र फडणवीस हा शक्तिमान नेता आहे, विरोधक याच्यावरच बोलतात. महायुतीमध्येही भाजप हा शक्तिमान पक्ष आहे. या पक्षाला डॅमेज केले तरच महायुतीची ताकद कमी होईल, हे मविआच्या नेत्यांना माहिती आहे. त्यांच्या स्ट्रॅटेजिस्टसनी हा सल्ला दिला आहे. मला समजलं की, कर्नाटकातील एका स्ट्रॅटेजिस्टने मविआच्या नेत्यांना, 'तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करा, त्यांची इमेज डाऊन करा,त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करा' असा सल्ला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते माझ्यावर ठरलेल्या रणनीतीनुसार टीका करत आहेत. पण एखादी गोष्ट तुम्हाला केव्हा चिकटते, तर जेव्हा लोकांनी तुमचं काम पाहिलेलं नसतं, तुमच्याविषयी त्यांना माहिती नसते. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने मला इतकी वर्षे काम करताना पाहिले आहे. जनता शेवटी आरोप करणाऱ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहत असते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो, ते कधीतरी एक्स्पोज होतो. अनिल देशमुखांनी आताच माझ्यावर आरोप करायला सुरुवात का केली? काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना यांच्या थिंक टँकने देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन करण्याची स्ट्रॅटेजी आखल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीचा निकाल लागल्यावर घेऊ: देवेंद्र फडणवीस


जागा कमी पडल्या तर शरद पवार की ठाकरे, कोण पहिली पसंती , फडणवीस म्हणाले कुणाची गरज लागणार नाही, आम्ही तिघेच पुरेसे आहोत, तशी परिस्थिती येणारच नाही. महायुतीचा मुख्यमंत्री कोण? हे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवू. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचा चेहरा आहेत. CM पदाबाबत आम्ही ठरवलं आहे, जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल. रोटेशनल मुख्यमंत्री अशी कोणतीही अट एकनाथ शिंदेंनी ठेवली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


आणखी वाचा


उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 23 तारखेची वाट बघा...