मुंबई महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधानपरिषदेत मोबाइलवर पत्ते खेळणं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवलं आहे. महायुतीनं माणिकराव कोकाटे यांचं खात बदलण्याचा निर्णय घेतला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा खातं हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे. विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तर महायुतीनं राजीनाम्याऐवजी खातेबदल करण्याचा मधला मार्ग स्वीकारल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement


अजित पवारांच्या विश्वासू नेत्याकडे कृषी मंत्रिपद


दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू नेते मानले जातात. ते इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदा मंत्रिपद देण्यात आलं होतं.  महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं होतं. आता माणिकराव कोकाटे यांच्या विधानपरिषदेतील पत्ते खेळण्यामुळं आणि शेतकऱ्यांसदर्भातील वक्तव्यांमुळं त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेत दत्तात्रय भरणे यांना दिलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


राष्ट्रवादीकडून खात्यांच्या अदलाबदलीबाबत पत्र 


अजित पवारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुणाला कृषीखाते देण्यात यावं आणि माणिकराव कोकाटे याना कोणतं खातं देण्यात याव याबाबतच पत्र देण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे यांना कृषीखात तर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता आहे. याबाबत दत्तात्रय भरणे यांना विचारणा केली असता ते सध्या इंदापूर मधे असून शेतात काम करत आहे.


देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरेंच्या बैठकीत निर्णय


आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेत त्यांना दुसरं खातं देण्याबाबत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.  माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी मान्य करण्याऐवजी महायुती सरकारनं कोकाटे यांच्याकडील खातं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विरोधी पक्षाकडून यावर काय भूमिका घेतली जाते ते पाहावं लागेल.