मुंबई : विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना विधानपरिषदेत मोबाइलवर पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, महायुती सरकारनं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खात बदलण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदललं जाणार आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रिपदाचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्याला दिला जाईल. तर, त्या मंत्र्याकडे असणारं खाते माणिकराव कोकाटे यांना दिलं जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात पत्ते खेळणं भोवल्याचं स्पष्ट होतं आहे. कोकाटेंना हे प्रकरण भोवल्याचं पाहायला मिळतंय. आता ते खातं कुणाला दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याला खातं दिलं जाईल ही माहिती मिळाली आहे.
एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आज संध्याकाळ पर्यंत खातेबदलाबाबत निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. आज संध्याकाळ पर्यंत याबाबत नोटिफिकेशन काढलं जाण्याची शक्यता आहे. कृषी खातं मकरंद पाटील किंवा दत्तात्रय भरणे या दोघांपैकी एकाला दिलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खातं आहे. तर, मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन हे खातं आहे. ज्या मंत्र्याला कृषी खातं दिलं जाईल त्या मंत्र्याकडील खातं माणिकराव कोकाटे यांना दिलं जाऊ शकतं. मदत व पुनर्वसन किंवा क्रीडा व युवक कल्याण खातं यापैकी एक खातं माणिकराव कोकाटे यांना दिलं जाईल.
विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना मोबाइलवर पत्ते खळत असल्याचा माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महायुती सरकारवर जोरदार टीका विरोधकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मोबाइलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ आणि सरकारला भिकारी म्हणण्यासंदर्भातील व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता महायुती सरकारनं माणिकराव कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदलण्याचा मधला मार्ग स्वीकारल्याचं दिसून येतं.