मुंबई: ड्रग्ज सेवनाच्या प्रकरणांमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींविरोधात धडाकेबाज कारवाई केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण एनसीबीनेच समीर वानखेडे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. या सगळ्या आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान समीर वानखेडे यांना चौकशीकरता 8 समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, आठवेळा समीर वानखेडे चौकशीसाठी हजर झालेच नाही. त्यामुळे आता न्यायालय यावर काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उच्च न्यायालयाने एनसीबीच्या शिफारसीनुसार समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी मान्यता दिल्यास याप्रकरणात चौकशी समिती स्थानप होऊ शकते. तसे घडल्यास समीर वानखेडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कोरोना काळात बॉलीवूड अभिनेत सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याने ड्रग्जच्या अंमलाखाली असताना राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री आणि ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या काळात एनसीबीचे विभागीय संचालक असलेल्या समीर वानखेडे यांनी कारवाईचा धडाका लावला होता. त्यांनी अनेक बॉलिवडू सेलिब्रिटींना एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. या सगळ्यामुळे समीर वानखेडे प्रकाशझोतात आले होते.
आर्यन खानवरील खोट्या कारवाईमुळे समीर वानखेडे फसले
समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगत एनसीबीने त्याला अटक केली होती. त्यामुळे आर्यन खानला बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले होते. हे प्रकरण प्रचंड गाजले होते. मात्र, नंतरच्या काळात समीर वानखेडे यांनी आर्यन खान याला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवल्याची माहिती समोर आली होती. आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप झाला होता. यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. त्यामुळे समीर वानखेडे यांची एनसीबीच्या संचालकपदावरुन उचलबांगडी झाली होती आणि त्यांच्यामागे न्यायालयाचा ससेमिरा लागला होता.
आता एनसीबीने समीर वानखेडे यांच्या चौकशीची गरज व्यक्त केल्याने कॉर्डिलिया क्रुझ प्रकरण आणि अन्य प्रकरणे पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतात. अशावेळी चौकशी समिती स्थापन झाल्यास समीर वानखेडे यांच्यासमोर अडचणी वाढू शकतात.
आणखी वाचा