मुंबई: राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांची सावली 'मीच मुख्यमंत्री',  असे म्हणत आहे. काही प्रवृत्ती देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. या प्रवृत्तींकडून मीच मोठा, असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टिप्पणी करत काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील शीतयुद्धावर बोट ठेवले. हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरुन टीकास्त्र सोडले.


हे सरकार निर्ढावलेले आहे. त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. आंदोलन करा किंवा अजून काही करा. पण यांना फरक पडत नाही. पण सर्वसामान्यांवर कष्टकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. अलिकडे नैतिकता गुंडाळून ठेवून तांत्रिक कारणे दाखवून चौकशी सुरू आहे, असे सांगत टोलवाटोलवीची भूमिका घेतली जात आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून धर्मव्यवस्था काम करत होती. आतादेखील आम्हीच सर्वेसर्वा आम्हीच धर्ममातंड मानून हे लोक काम करत आहेत. मुठभर भांडवलदारांना सोबत घेऊन ते काम करत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.


आज प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या कामांची प्रत्यक्ष सुरूवात करताना शिवजयंती असावी हा दुग्धशर्करा योग आहे. अठरापगड जातींना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्यांचे संवर्धन केलेच पाहिजे. गडकिल्यांवर गेल्यावर इतिहास कळण्याएवजी भलतेच काहीतरी दिसते, असे सपकाळ यांनी म्हटले. हे सरकार दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असे काम करत आहे. डान्सबार बंदी का केली होती त्यावेळची परिस्थिती काय होती. महिलांच्या कहाण्या होत्या. हा शेतीमातीपर्यंत पोहचलेला निर्णय होता. एका विकृतीला आम्ही विरोध करु. पर्यटनाच्या नावावर पब आणि डान्सबारला परवानगी देण्याचे काम हे सरकार करत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मतदार यादीत बोगसपणा नाही तर यांच्या सदस्य नोंदणीत सुद्धा बोगसपणा आहे. 1 कोटी सदस्य नोंदणी झाली म्हणतात तर मग शिवसेना का फोडली मग राष्ट्रवादी का फोडली? भाजप विचार घेऊन नाही तर ईडी घेऊन पुढे जाते. हे सत्ता म्हणून पुढे जातात संविधान म्हणून पुढे जात नाही, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.



आणखी वाचा


साध्यासुध्या चेहऱ्याला सिंहासनावर बसवलं, हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमून काँग्रेसचा मोठा मास्टरस्ट्रोक, भाजप चेकमेट!