भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा गळती लागली असल्याचे चित्र आहे. नेते अपमानित करत असल्याचा आरोप करत भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समितीचे उपसभापती व काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष हिरालाल नागपूरे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्याकडे राजीनामा पाठविला असून त्यात काँग्रेसचे नेते अपमानित करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नागपुरेंच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा गळती लागली असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पक्षाची राज्यातील गळती थांबवायला गेलेल्या नाना पटोले यांना मात्र, आपल्या गृहजिल्ह्यातील गळती थांबवताना अनंत अडचणींचा सामना करावा लागताना दिसतो.
तुमसर तालुक्यातील सिलेगाव पंचायत समिती गणातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले हिरालाल नागपूरे यांची तुमसर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी निवड झाली करण्यात आली आहे. मात्र त्यांनी काल अचानक राजीनामा दिला. जिल्हाध्यक्षांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात नागपूरे यांनी पंचायत समिती अंतर्गत सभापती, उपसभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व समिती सभापतीच्या निवडीनंतर तालुक्यातील काँग्रेस नेते मला वारंवार अपमानित करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे व्यथित होऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. एखाद्या उपसभापती स्तराच्या व्यक्तीने राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षात मोठी गटबाजी फोफावली असल्याचे समोर आले आहे.
नाना पटोले यांच्या आक्रमक शैलीमुळे हायकमांडनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नानांवर सोपविली. नानांनी काँग्रेसला नवसंजीवनी देत राज्यात प्रबळ पक्ष बनविला आहे. आपल्या संघटन कौशल्यामुळे दिग्गज नेत्यांचीही काँग्रेस पक्षात एंट्री मिळवून दिली. हे सर्व करताना मात्र नानांचे भंडारा जिल्ह्यात दुर्लक्ष झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोकांच्या हातात जिल्हा सोपविणे आता चुकीचे ठरू लागले आहे. ज्या लोकांना जिल्हा सोपविला त्यांनी नानाच्या नावाचा गैरवापर जिल्ह्यात सुरू केला असल्याची ओरड सुरू झाली आहे. या शिवाय नानांच्या पत्राचा चुकीचा वापर ही जिल्ह्यात होत असल्याचे पाहण्यात येत आहे.
जिल्हा उपाध्यक्षांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा
जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष आजबले यांनी काही दिवसांपूर्वीच आत्मदहनाच्या इशारा दिला होता. या इशाऱ्यात खनिकर्म समितीच्या सदस्य नियुक्तीमध्ये नाना पटोले यांच्या पत्राचा चुकीच्या वापर झाल्याचे समोर आले आहे. सुभाष आजबले यांनी स्वतः ही माहिती दिली. याउलट वेळोवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाईसुद्धा नानांना याबाबत अवगत करत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. त्यामुळे नानांनी जिल्ह्यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. भंडारा जिल्हा काँग्रेसची नवीन फळी तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही तर राज्य काबीज करायला निघाले आणि जिल्हा गमावून बसले, अशी गत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.