Maharashtra Congress : मुंबई काँग्रेसमध्ये बदल केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीतही लवकरच बदल केले जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले जाणार आहेत अशी माहिती काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
राज्यात काँग्रेसची काही वर्षांपूर्वी मजबूत ताकद होती. पण 2014 पासून राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरु झाली. 2019 मध्ये तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. लोकसभेत कसाबसा एक खासदार आणि विधानसभेत 44 आमदार निवडून आले होते. गेल्या चार वर्षांत पक्ष वाढीसाठी फार काही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे पुढील काळात काँग्रेसला चांगलं यश मिळण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी हे काँग्रेस महाराष्ट्र कार्यकारिणीत आता बदल केले जाणार आहेत.
नाना पटोले यांच्यावर पक्ष नेते नाराज?
विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यपदावरुन हटवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार तसेच कार्यकारिणीतही काही बदल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढे देखील मीच अध्यक्ष राहिन असं नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
काय बदल होण्याची शक्यता
अध्यक्षपदी - अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात किंवा सतेज पाटील यांच्यातील एका नेत्याची वर्णी लागू शकते. त्यावर हायकमांड विचार करत आहे. तसेच कार्याध्यक्षपदी यशोमती ठाकूर, भाई जगताप किंवा इतर नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पुढे कार्यकरणीत बदल केल्यानंतर विधीमंडळ गटनेते पदी नाना पटोले किंवा पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या सर्वांबाबत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी विचार करत आहेत
जो नवीन प्रभारी होईल तो निर्णय घेईल
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांना कार्यकारिणीत काय बदल होतील या संदर्भात माध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, "मी कर्नाटक मंत्रिमंडळात मंत्री होत आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र प्रभारीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर जो कोणी, कधी नवीन प्रभारी होईल तो त्यावर निर्णय घेईल. आज मी त्यावर बोललो तर ते चुकीचे आहे."
हेही वाचा