Rashmi Barve On BJP : नागपूर : भाजपच्या (BJP) एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप, महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरलेल्या आणि जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे उमेदवारी अर्जही बाद ठरलेल्या रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांनी केला आहे. तसेच, पुढे बोलताना, "त्यावेळी नागपुरातील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता", असाही गंभीर आरोप नाव न घेता रश्मी बर्वेंनी भाजप नेत्यांवर केला आहे. 


काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे बोलताना म्हणाल्या आहेत की, "भाजपच्या एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी नागपुरातील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता." रश्मी बर्वे यांच्या जात आणि जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज अंतरिम स्थगिती देत रश्मी बर्वे यांना काही अंशी दिलासा दिला होता. त्यानंतर रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. 


रश्मी बर्वे यांनी कोणाचेही नाव घेतलं नाही, मात्र भाजपचा तो मोठा नेता नेहमीच सत्याच्या बाजूनं राहतो आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहतो अशी त्याची प्रतिमा होती. त्यामुळे मला त्याने त्या बड्या नेत्यांपासून मोठी अपेक्षा होती. मात्र, माझ्या प्रकरणात माझ्यावर अन्याय होत असताना भाजपचा तो नेता आपल्या पक्षाच्याच बाजूने उभा राहिला. त्यामुळे त्या आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या नेत्यापासून माझा भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया रश्मी बर्वे यांनी दिली. दरम्यान, नैतिक वस्त्रहरण करणारा भाजपचा तो बडा नेता कोण आणि रश्मी बर्वे यांचा रोख नेमका कुणाकडे? अशा चर्चांना उधाण आलं आहे. संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत धृतराष्ट्राची भूमिका बजावणारा भाजप नेता कोण? याचाही खुलासा रश्मी बर्वे यांनी केलेला नाही. एकंदरीत रश्मी बर्वेंच्या गंभीर आरोपांमुळे चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. 


काँग्रेसच्या रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्द


जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्दच ठेवण्यात आली आहे. रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीत प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, मात्र उमेदवारी अर्ज रद्दच ठेवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने निकालाला स्थगिती दिली आहे.


पाहा व्हिडीओ : Nagpur Rashmi Barve : भाजपच्या नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण : रश्मी बर्वे