Uddhav Thackeray-Rahul Gandhi Meet : महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबईतील कलानगरच्या मातोश्रीचं (Matoshree) एक वेगळं महत्व आहे, ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर मानलं जातं. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंतच्या (Uddhav Thackeray) राजकीय कारकिर्दीत अनेक दिग्गज नेत्यांनी मातोश्रीवर गाठीभेटी घेतल्या आहेत, या भेटीनंतर काही समीकरणं जुळली तर काही बिघडली आहेत. आता पुन्हा एकदा मातोश्री चर्चेत आहेत ते म्हणजे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मातोश्रीवर येण्याने.


27 नोव्हेंबर 2019
आदित्य ठाकरें सोनिया गांधींच्या भेटीला 
ठिकाण - दिल्ली


21 फेब्रुवारी 2020  
ठाकरे आणि गांधी कुटुंबीयांमध्ये भेट 
ठिकाण - दिल्ली


11 नोव्हेंबर 2022
आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी भेट 
ठिकाण - भारत जोडो यात्रा, महाराष्ट्र


आणि आता परत 
लवकरच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे भेटणार 
आणि ते ठिकाण असणार आहे 'मातोश्री' 


आजवरच्या राजकीय इतिहासात गांधी घराण्यातल्यांपैकी हे पहिले गांधी आहेत जे मातोश्रीवर येत आहेत


राहुल गांधींच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंचीही अडचण!


गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांवरुन चर्चेत राहिले आहेत. सावरकरांचा मुद्दा, सूरत कोर्टाने सुनावलेली शिक्षा आणि त्या शिक्षेनंतर राहुल गांधीचे सदसत्व रद्द अशा एक ना अनेक कारणांनी राहुल गांधी चर्चेत राहिले. पण या सर्वांत अडचण निर्माण झाली ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. कारण गांधींची सावरकरांच्या विरोधातली भूमिका ही ठाकरेंना पटलेली नाही. हिच भूमिका गांधींना तर अडचणीत आणणारी ठरलीच पण त्याचबरोबर ठाकरेंनाही अडचणीत आणलं. 


डॅमेज कंट्रोलसाठी राहुल गांधी मातोश्रीवर?


हिच ठिणगी हळुहळु महाविकास आघाडीत वणवा पेटवत आहे, तीन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र नांदत असताना विविध मुद्द्यांवर वाद वाढताना दिसत आहेत. भाजपविरोधात मूठ बांधण्याची तयारी दिल्लीत सुरु आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला जात आहेत तर सावरकरांच्या मुद्यावरुन डॅमेज कंट्रोल करायला राहुल गांधी आता मातोश्रीवर येत आहेत का? अशी चर्चा सुरु आहे. 


2019 साली उद्धव ठाकरे आणि भाजपच्या वादात महाविकास आघाडीची स्थापना झाली. अमित शाहांनी मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नाही म्हणून 25 वर्षांची युती तोडत ठाकरेंनी गांधी आणि पवारांची साथ पकडली. महाविकास आघाडीला पाठिंबा देतानाही काँग्रेसने सर्वात उशिरा आपला निर्णय कळवला होता.



  • मिनिमम कॉमन प्रोग्रामवर महाविकास आघाडी तयार झाली होती. पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्याच वाचाळ वक्तव्यांनी आघाडीत बिघाडी होऊ लागली.

  • त्यात राहुल गांधीचा सावरकरांचा मुद्दा हा जास्तीच त्रासदायक ठरु लागला. अखेरीस पवारांनी दिल्लीतल्या एका बैठकीत सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढली होती 

  • त्यानंतर राहुल गांधीनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. जर माझ्या वक्तव्यामुळे आपल्या मित्रपक्षांना त्रास होत असेल तर मी यापुढे वक्तव्य करणार नाही.


राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीचा मुख्य अजेंडा काय?


बिहारामध्ये नितीशकुमार यांचा जेडीयू, तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि काँग्रेस पक्ष महायुतीच्या रुपात एकत्र आहेत. आगामी निवडणुकीतही ते एकत्र लढण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेस, जेडीयू आणि आरजेडी या पक्षांच्या राहुल गांधी, नितीश कुमार तसेच तेजस्वी यादव असे सगळेच सहभागी झाले होते. बिहारच्या या पॅटर्ननंतर एक पाऊल मागे टाकत राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. महाविकास आघाडी टिकावी आणि उद्धव ठाकरेंची समजूत काढावी हा मुख्य अजेंडा राहुल गांधीचा असणार आहे. 


राहुल गांधींच्या भेटीने उद्धव ठाकरेंचा फायदा की तोटा?


सत्तेतले आणि सत्तेबाहेरचे अनेक दिग्गज नेते मातोश्रीवर येऊन गेले आहेत. दिल्ली आणि पंजाबचे आपचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि भगवंत मान हे मातोश्रीवर आले होते. या भेटीने देशातला विरोधी पक्ष एकवटत असल्याचा संदेश भाजपला देण्यात आला. त्यात आता राहुल गांधीची मातोश्रीवरची एन्ट्री उद्धव ठाकरेंसाठी फायद्याची ठरतेय का तोट्याची हे निवडणुकीत स्पष्ट होईल.