मुंबई: दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे गदारोळ निर्माण झाला आहे. दिल्लीत काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत (आप) युती करायला पाहिजे होती. अरविंद केजरीवाल यांचाच पक्ष ही निवडणूक जिंकेल, अशा आशयाचे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य व्हायरल झाले होते. त्यामुळे देशभरात अगोदरच उतरती कळा लागलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी खच्ची झाले. 'आप'च्या नेत्या प्रियंका कक्कड यांनी काँग्रेस पक्षाने वास्तव स्वीकारल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले होते. साहजिकच पृथ्वीराज चव्हाण यांचे हे वक्तव्य काँग्रेसजनांसाठी खच्चीकरण करणारे ठरले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला. मी दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ सोडून अर्थ काढण्यात आला. दिल्लीत इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर त्यांचा विजय पक्का होता. मात्र, आता दिल्लीत सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या काही दिवसांत दिल्लीत काँग्रेस पक्षाला उभारी मिळाली आहे. याचे रुपांतर विजयात होईल, अशी खात्री मला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर दिल्लीतील काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांना आम आदमी पक्ष जिंकतो असे वाटत असेल तर त्यांनी केजरीवालांच्या पक्षात गेले पाहिजे. इंडिया आघाडीची युती लोकसभा निवडणुकीसाठी होती, विधानसभेसाठी नाही. मात्र, इंडिया आघाडीतील काही घटकपक्षांना वाटते की, दिल्लीची निवडणूक जिंकल्यास काँग्रेसचे स्थान बळकट होईल, असे संदीप दिक्षित यांनी म्हटले.
संजय राऊत 'आप'ला पाठिंबा देण्याबाबत काय बोलले?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने आम आदमी पक्षाला पाठिंबा देऊ केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, पण आमचा पक्षात भूमिका स्पष्ट होत नाही. काँग्रेसदेखील आमचाच मित्रपक्ष आहे. आम्ही एकत्र आहोत. केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आमच्या संपर्कात जास्त असतात. जरी पृथ्वीराज चव्हाण म्हणत असतील आप आणि काँग्रेसने दिल्लीतल्या विधानसभा एकत्र लढल्या असत्या तर तेथील चित्र वेगळे असते. पण कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. जे दिल्ली विधानसभेत घडला त्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील घडू शकतात. लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल