मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान हे उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी तत्परतेने नसीम खान (Arif Naseem Khan) यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. तुम्ही आमच्या पक्षात या. मुंबईतील तुम्ही सांगाल त्या जागेवरुन आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. आम्ही तुमच्यासाठी जाहीर केलेला उमेदवार मागे घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले होते. मात्र, नसीम खान यांनी एमआयएमच्या या ऑफरवर काहीच बोलण्यास नकार दिला. ते शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


यावेळी नसीम खान यांना एमआयएम पक्षाने दिलेल्या प्रस्तावाविषयी विचारण्यात आले. त्यावर नसीम खान यांनी म्हटले की, मला याबाबत काहीही भाष्य करायचे नाही. माझ्याविषयी सहानुभूती दर्शविली त्यासाठी मी धन्यवाद देतो. यापेक्षा अधिक मला बोलायचे नाही. मी काँग्रेस पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे, असे नसीम खान यांनी सांगितले. 


प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची भूमिका राहिली आहे की, प्रत्येक जातीधर्माला न्याय मिळाला पाहिजे. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रात यंदा काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाच्या एकाही व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही.  त्यामुळे अल्पसंख्याक समाजात नाराजी आहे. राज्यातून अनेकजण मला फोन करुन रोष व्यक्त करत आहेत. तुम्ही वरिष्ठ नेते असताना काय अडचण आहे की तुम्हाला  एकही उमेदवार देता आला नाही, असा सवाल मला अनेकजण विचारत आहेत, असे नसीम खान यांनी म्हटले.


एमआयएमने नसीन खान यांना नक्की काय ऑफर दिली?


एमआयएमचे खासदार नसीम खान यांनी नसीम खान यांना त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली. नसीम खान यांना दिलेल्या प्रस्तावात जलील यांनी म्हटले की, की मी वारंवार महाविकास आघाडीविषयी बोलत आलो आहे, की त्यांना मुसलमानांची मतं पाहिजेत, पण मुस्लीम नेतृत्व नको आहे. यंदा महाराष्ट्रात त्यांनी एकही जागा मुस्लीम उमेदवाराला दिलेली नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांनी मुंबई नाही, तर किमान राज्यभरात कमीत कमी एक जागा तरी मुस्लीम समाजातील उमेदवारासाठी सोडायला हवी होती. 


नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांनी पक्षालाच लाथ मारायला पाहिजे होती. नसीम खानजी, तुम्ही फक्त एकदा हिंमत दाखवा, त्यांना सोडा, आणि आमच्या पक्षात सामील व्हा. आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करु. तुम्ही मुंबईतील कोणतीही जागा सांगा. आम्ही अगदी जाहीर केलेले उमेदवारही मागे घेऊ आणि तुम्हाला संधी देऊ, अशी खुली ऑफरच इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना देऊ केली होती.


आणखी वाचा


मुंबई काँग्रेसमधील आणखी एक बडा नेता नाराज, स्टार प्रचारकपदाचा राजीनामाच देऊन टाकला