नागपूरः विदर्भातील नेत्यांकडे कॉंग्रेसचे कायम दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. विदर्भातील नेत्यांना संधी दिली जात नाही. विधान परिषद निवडणुकीतही हाच प्रत्यय आला. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे विदर्भाकडे कायम दुर्लक्ष असते. कॉंग्रेसने विदर्भाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. हे दुर्लक्ष पुढील काळात कॉंग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्येच सुरू आहे. दुसरीकडे भाजपने अमरावतीचे श्रीकांत भारतीय यांना संधी देऊन विदर्भाकडे आमचे लक्ष आहे, असा संदेश दिला आहे.


भाजपने राज्यसभेसाठी अमरावतीचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि विधान परिषदेसाठी श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील नेते प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी संधी दिली आहे. पण यात विदर्भाला प्रतिनिधित्व दिले, असे म्हणता येणार नाही. कारण पटेल त्यांचे परंपरागत उमेदवार आहेत, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विधान परिषदेसाठी कॉंग्रेसने दोन्ही उमेदवार मुंबईचे दिल्यामुळे नागपूर आणि विदर्भातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसत आहे. काहींनी खासगीत तसे बोलूनही दाखवले.


विदर्भाच्या भरवशावर सत्तेचा लाभ घेणाऱ्या आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीत लक्षणीय आमदार दिल्यानंतरही काँग्रेसने विधान परिषदेसाठी विदर्भातील एकाही उमेदवाराचा विचार केला नाही. दोन्ही उमेदवार मुंबईतील देऊन विदर्भावर अन्याय केल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे चार आणि काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसने उत्तरप्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.


विदर्भातील मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली. किमान उमेदवारांचे राज्य तरी बदलवा, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. पण याची कुणीच दखल घेतली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट हायकमांडला पत्र लिहून वासनिकांना महाराष्ट्राचे उमेदवार करा, अशी सूचना केली होती. त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होऊन संघटन मजबूत करण्यासाठी होऊ शकतो, असाही सल्ला देण्यात आला होता. मात्र, काँग्रेस नेतृत्व आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.


भाजप कार्यकर्त्यांत 'कही खुशी कही गम'
त्यानंतर विधान परिषदेसाठी किमान एक उमेदवार विदर्भातून पाठविला जाईल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांची नावे निश्चित केल्याने विदर्भातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उरलीसुरली आशाही मावळली आहे. माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण विदर्भातील एक उमेदवार द्यावा, यासाठी आग्रही होते. नागपूरमधील एका उमेदवाराच्या नावासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी मुकुल वासनिक यांचाही होकार होता असेही समजते. मात्र, केंद्रातून हिरवी झेंडी मिळाली नाही. भाजपने राज्यसभेसाठी अमरावतीचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि विधान परिषदेसाठी श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली आहे. बोंडे राजकीय तर भारतीय संघटनेचे कार्यकर्ते आहेत. दोघांना उमेदवारी देऊन भाजपने समतोल साधला आहे.


शिवसेनेसाठी मुंबईच महत्वाची..
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत चंद्रपूरमधील अनिरुद्ध बनकर यांच्या नावाचा समावेश आहे. ही यादी राज्यपालांनी दोन वर्षांपासून अडवून ठेवली आहे. राष्ट्रवादीतर्फे विदर्भातील प्रफुल्ल पटेल यांना सांभाळण्याचे काम सातत्याने केले जात आहे. हा अपवाद सोडला तर फारसे लक्ष दिले जात नाही. शिवसेनेला मुंबईच महत्त्वाची वाटते. हे लक्षात घेता किमान काँग्रेसने तरी पक्षाला भरभरून देणाऱ्या विदर्भाला झुकते माप द्यावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.